पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत केवळ आश्वासने दिली असून, ती पूर्ण करण्यासाठी फारसे काही केलेले दिसत नसल्याचे मत ‘पंजाब केसरी’चे मुख्य संपादक विजय चोप्रा यांनी शनिवारी घुमानमध्ये व्यक्त केले.
घुमान येथे सुरू असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना चोप्रा यांनी मोदींना मिळालेल्या यशाचे विश्लेषण करताना प्रस्थापित सत्ताधाऱयांविरोधात असलेल्या रोषाचा त्यांना फायदा झाल्याचे मत मांडले. ते म्हणाले, काळे पैसे अजून परत आणण्यात आलेले नाहीत. महागाईही अजून कमी झालेली नाही. त्यांनी आश्वासने खूप दिलेली आहेत. मात्र, अजून ती पूर्ण करण्याच्या दिशेने फारसे काही केलेले दिसत नाही.
चोप्रा यांनी पेड न्यूजच्या विषयावरूनही मोदी यांच्यावर टीका केली. माध्यमांमध्ये सध्या ‘पेडन्यूज’ दिल्या जातात. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चोप्रा म्हणाले, निवडणुकीवेळी उमेदवार निर्धारित मर्यादेइतकाच खर्च दाखवतात. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त खर्च करतात. मोदी यांनी स्वतःही असेच केले आहे.