बोगद्यातील छिद्र आणि मोबाइल फोन ठरला ‘त्या’ १६ मजुरांसाठी तारणहार

एक क्षण तर, असं वाटलं होतं, आम्ही आमच्या कुटुंबीयांना पुन्हा पाहू शकणार नाही.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनीत येथील जोशी मठ परिसरात रविवारी सकाळी हिमकडा कोसळला. त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. चमोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊन पूरस्थिती उदभवली. तपोवन येथील एका बोगद्यामध्ये पुराचे पाणी भरल्याने १६ मजूर अडकले होते. पण आयटीबीपीच्या जवानांनी रविवारी संध्याकाळी त्यांची सुटका केली. ही घटना घडली, त्यावेळी सुनील दि्वेदी हा मजूर बोगद्यात काम करत होता. अचानक पाणी भरल्यामुळे आतमध्ये किती भयानक परिस्थिती निर्माण झाली होती, तो अनुभव त्याने सांगितला.

“हिमकडा कोसळला त्यावेळी मी ड्युटीवर होतो. बोगद्याच्या आतमध्ये आमचे काम सुरु असताना, अचानक बाहेर गोंधळ सुरु झाला. लोक ओरडून आम्हाला बाहेर येण्यास सांगत होते. आम्हाला आश्चर्य वाटलं, बाहेर काय घडलं, या विचारात आम्ही होतो, तितक्यात अचानक प्रचंड वेगाने बोगद्यात पाणी भरायला सुरुवात झाली. अचानक घडलेल्या या प्रकाराने आम्ही हादरून गेलो. बाहेर निघणं आम्हाला शक्य झालं नाही. बोगद्यात ३०० मीटर आतमध्ये आम्ही होतो. आम्ही छताला लटकलेल्या लोखंडी रॉडला पकडले, जेणेकरुन आमचा चेहरा पाण्याच्या वर राहिल. तासभर आम्ही त्याच अवस्थेत होतो” असे हॉस्पिटलच्या बेडवरुन सुनीलने सांगितले.

पाहा फोटो >> हाहाकार आणि जीव वाचवण्याची धडपड; पहा जलप्रलयानंतरची झोप उडवणारी दृश्य

“एक क्षण तर, असं वाटलं होतं, आम्ही आमच्या कुटुंबीयांना पुन्हा पाहू शकणार नाही. पण काही वेळाने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आणि आम्ही खाली आलो. आम्ही एका मोठया दगडावर चढून पुढे गेलो. त्यावेळी श्वासही नीट घेता येत नव्हता. त्यानंतर बोगद्यामध्ये तडा गेल्यामुळे तयार झालेले एक छिद्र आम्हाला दिसले. ताजी हवा घेण्यासाठी आम्ही तिथे एकत्र जमलो. त्या छिद्रामुळे आमच्यामध्ये पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण झाली. दुसऱ्या एक मजुराजवळ मोबाइल होता. सुदैवाने त्यावेळी आतमध्ये नेटवर्क पकडत होते. त्याने एनटीपीसीच्या सुपरवायजरला फोन केला. त्यानंतर काही वेळाने ITBP चे जवान आतमध्ये आले व त्यांनी आमची सुटका केली” असे सुनीलने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tiny crack mobile inside tunnel gave us hope uttarakhand glacier burst survivors recount horror dmp

ताज्या बातम्या