नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) शुक्रवारी दिल्लीच्या कनॉट प्लेस भागातील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित केलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ सभेपूर्वी, दिल्ली प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासकीय कारणांमुळे १६ आणि १७ ऑक्टोबरला सेंट्रल पार्क जनतेसाठी बंद राहील, अशी घोषणा नवी दिल्ली महापालिकेने केली आहे. मात्र, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या सभेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केले आहे.
दुसरीकडे, कनॉट प्लेस आणि आजूबाजूच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १६३अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश (जमावबंदी) आधीपासूनच लागू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी, पोलिसांनी निवडक गटाला राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी दिली, पण सामान्य जनतेला त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. निदर्शकांनी ‘बीएनएसएस’ आदेशांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले.
दुसरीकडे, दिपके यांनी शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. विरोधी पक्ष, नागरी संघटना, शेतकरी, विद्यार्थी संघटना, व्यापारी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे. तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही आणि मतदानाचा अधिकार सुरक्षित राहिला तरच नागरिकांचे अधिकार सुरक्षित राहतील, असे दिपके म्हणाले.
तिरंगा सभा रोखण्यास न्यायालयाचा नकार
‘सीजेपी’ने शुक्रवारी आयोजित केलेली तिरंगा सभा रोखण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. या सभेविरोधात दाखल याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. नितीन वासुदेव सांबरे आणि न्या. संजय शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सणासुदींचे दिवस पाहता, सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या कायद्यानुसार, या निदर्शनाचे नियमन करण्यासाठी दिल्ली पोलिसांना निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. उच्च न्यायालयाने त्यास नकार दिला. मात्र, निदर्शकांच्या कृतींचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याबद्दल पोलिसांकडून हमी घेतली.
