उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते त्यांच्या कामापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच चर्चेत राहिल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या करोनासंदर्भातील वक्तव्यापासून ते अगदी फाटलेल्या जिन्ससंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन वाद झाल्याचं चित्र पहायला मिळालं. सोमवारी तीरथ सिंह रावत हे दिल्लीमध्ये होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. मोदींची भेट घेतल्यानंतर रावत यांनी एक मोदींचा एक फोटो पोस्ट केला असून हा फोटो आणि त्याची कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रावत यांनी पंतप्रधान मोदींचा केदारनाथमधील जुना फोटो ट्विट केला आहे. “आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान मी त्यांना करोना साथीची परिस्थिती सुधारल्यानंतर योग्य वेळी देवभूमि उत्तराखंडला येऊन पवित्र चार धाम दर्शनसाठी येण्याचं आमंत्रण दिलं,” अशी कॅप्शन या फोटोला रावत यांनी दिलीय.

नक्की वाचा >> “अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं”; मोदींचं कौतुक करता करता उत्तराखंडचे मुख्यमंत्री भरकटले

या ट्विटखाली अनेकांनी सर्वसामान्यांसाठीही ही यात्रा पुन्हा सुरु करावी अशी मागणी रावत यांच्याकडे केलीय. तर काहींनी राज्यातील विकास कामांबद्दलही मोदींना सांगा असं म्हटलं आहे. रावत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान उत्तराखंडमधील विकास कामं, वेगवेगळ्या सरकारी योजनांची अमंलबाजवणीसारख्या विषयांवर चर्चा झाल्याचं रावत यांनी स्पष्ट केलं. जे. पी. नड्डा यांनी उत्तराखंडला आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिल्याबद्दल रावत यांनी नड्डा यांचे आभारही मानलेत.

नक्की वाचा >> “भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्णाप्रमाणे भविष्यात लोकं मोदींचीही पूजा करतील”

मार्च महिन्यामध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तीरथ सिंह रावत यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. मुख्यमंत्री होण्यापूर्वी खासदार तीरथ रावत हे उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले होते. रावत भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुद्धा आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी दिलेल्या एका भाषणामध्ये तीरथ सिंह यांनी मोदींची तुलना श्री राम आणि भगवान श्री कृष्णाशी केली होती.  ज्या पद्धतीने त्रेता आणि द्वापर युगामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता त्याचप्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदींना लक्षात ठेवलं जाईल. भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्णाप्रमाणे भविष्यात लोकं मोदींचीही पूजा करतील, असं तीरथ सिंह रावत म्हणाले होते.