पीटीआय, मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (‘टिस’) ८६व्या पदवीदान समारंभाला टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी. एस. रमेश हे प्रमुख पाहुणे असतील, असे मंगळवारी सांगण्यात आले. हा कार्यक्रम २२ ऑगस्टला होणार आहे. कार्यक्रमासाठी सरन्यायाधीशांच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे प्रमुख पाहुण्यांमध्ये बदल करण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, २ ऑगस्टला होणाऱ्या पदवीदान समारंभासाठी सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत हे प्रमुख पाहुणे असणार होते. मात्र, कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी, ३१ जुलैला ‘अनपेक्षित परिस्थिती’चे कारण देत ‘टिस’ने हा कार्यक्रम पुढे ढकलला होता. सरन्यायाधीशांच्या भेटीमुळे विद्यार्थी निदर्शने करतील, अशी भीती संस्थेच्या अधिकाऱ्यांना वाटत असल्याची शक्यता तेव्हा वर्तवली गेली होती. न्या. कांत यांनी १५ मे रोजी एका सुनावणीदरम्यान केलेली झुरळ टिप्पणी, त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी चळवळ आणि त्यापाठोपाठ नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधातील निदर्शने या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विरोधाची शक्यता वर्तवली जात होती.

दरम्यान, पदवीदान समारंभ अचानक पुढे ढकलला गेल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या अभावामुळे कार्यक्रम रद्द केल्याचे तेव्हा बोलले गेले होते. मात्र, कोणतेही अधिकृत कारण दिले गेले नव्हते. ‘टिस’च्या सूत्रांनी मंगळवारी सांगितले की, न्या. कांत यांच्या नोव्हेंबरपर्यंतच्या तारखा उपलब्ध नसल्याने ते २२ ऑगस्टच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचे सरन्यायाधीशांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.