Asish Banerjee TMC leader suicide note : तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आशिष बॅनर्जी यांनी रविवारी सकाळी त्यांच्या बीरभूम जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केली. ते माजी मंत्री आणि रामपूरहाटमधून पाच वेळा आमदार राहिले होते. त्यांनी लिहिलेली आत्महत्येची चिठ्ठीही घटनास्थळी सापडली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आशिष बॅनर्जी यांनी २००१ ते २०२६ या काळात सलग २५ वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बॅनर्जी यांचा भारतीय जनता पक्षाचे ध्रुव साहा यांच्याकडून पराभव झाला होता. आशिष बॅनर्जी यांनी काल (१५ ऑगस्ट) स्थानिक स्वातंत्र्यदिन सोहळ्यात भाग घेऊन तिथे तिरंगा फडकवला. तर, दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपलं जीवन संपवलं.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?
घटनेच्या ठिकाणी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. या पत्रात बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीही भ्रष्टाचारात सामील नसल्याचं सांगत कोणतंही चुकीचं काम नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी तारापीठ रामपूरहाट विकास प्राधिकरणाशी संबंधित कथित गैरव्यवहारांच्या आरोपांचा संदर्भ दिला आहे. तिथे ते अध्यक्ष होते. नियोजन आणि विकास संस्थेच्या निविदांशी संबंधित निर्णय, धनादेश जारी करणे, योजना मंजुरी किंवा ना-हरकत प्रमाणपत्र यामध्ये आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला. आपली बदनामी आणि मानहानी करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करत राजकारणात येणं ही एक चूक होती, असं आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी म्हटलं. ते पक्षांतर्गत चालणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा नेहमीच निषेध करू शकले नाहीत.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या पक्षीय सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीतील पराभवानंतर बॅनर्जी राजकारणात फारसे सक्रिय दिसले नव्हते. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने सरकार स्थापन केल्यामुळे, पश्चिम बंगालमधील टीएमसीची १५ वर्षांची सत्ता गेल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला आहे. सत्ता बदलामुळे अनेक माजी टीएमसी नेते आणि आमदारांना भ्रष्टाचाराशी संबंधित चौकशी आणि अटकेला सामोरं जावं लागलं आहे. बॅनर्जी यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली नेमकी परिस्थिती त्वरित स्पष्ट होऊ शकलेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
