TMC crisis Kalyan Banerjee: अंतर्गत बंडाळी आणि पक्षफुटीचा सामना करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे नेते रोज नव्याने खुलासे करत असून, पक्ष नेतृत्वासह अंतर्गत राजकारणावर गंभीर आरोप करत आहेत. अशा तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जींनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. अभिषेक बॅनर्जी अतिशय अहंकारी असल्याचा आरोप करत त्यांनी ज्येष्ठांचा अनादर केला, त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही, असे टीकास्त्र सोडले. तृणमूल काँग्रेसच्या अधोगतीसाठी अभिषेक बॅनर्जीच जबाबदार असल्याचा आरोपही कल्याण बॅनर्जी यांनी केला.

ममतांचे निष्ठावंत कल्याण बॅनर्जी

अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात सुरु असणाऱ्या बनावट स्वाक्षरी प्रकरणात ऐनवेळी त्यांची वकील म्हणून हकालपट्टी केल्याचा आरोप कल्याण बॅनर्जींनी केला. विधानसभेत ६० आमदारांनी बंडखोरी करुन वेगळा गट स्थापन केला, लोकसभेत २० खासदारांनी युती सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि आतापर्यंत तीन राज्यसभा खासदारांनी ममतांची साथ सोडली असली तरी, कल्याण बॅनर्जींनी ममतांबरोबर उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, त्यांनी देखील आता ममतांना, अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्यात निवड करण्याचा, अल्टिमेटम दिला आहे.

नक्की काय म्हणाले कल्याण बॅनर्जी?

“मी ममता बॅनर्जी यांच्याबरोबरच आहे. पण आता त्यांनी निवड करण्याची गरज आहे. हे खूप अपनास्पद आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वकील बदलण्यात आल्याचे मला सांगितले जाते. त्यांना (अभिषेक बॅनर्जी) ज्येष्ठांचा आदर कसा करायचा हे माहिती नाही. अभिषेक यांनी माझ्यावर कधी विश्वास ठेवला नाही आणि भविष्यातही ठेवणार नाहीत. कोण आहेत ते? खूप अहंकारी आहेत. त्यांच्यामुळेच पक्षाची ही दुर्दशा झाली आहे”, असा आरोप कल्याण बॅनर्जींनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आरोप

बनावट स्वाक्षरी प्रकरणावरुन सीआयडीने ममता आणि अभिषेक यांच्या घरावर छापेमारी केली त्यावेळी ते तिथं उपस्थित असल्याचा खुलासा कल्याण बॅनर्जींनी केला. सीआयडीने केलेले तपासाला आव्हान देणारी याचिका दाखल केल्याचे सांगताना कोर्टात जाण्यापूर्वीच त्यांच्याऐवजी किशोर दत्ता या प्रकरणात वकील म्हणून काम पाहणार असल्याचे समजले, असेही बॅनर्जी म्हणाले. अभिषेक यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. स्वाक्षरीच्या प्रकरणाची वकील म्हणून जबाबदारी काढून घेतल्याची माहिती मुलाने देल्याचेही कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले.