TMC crisis Shatrughan Sinha: विधानसभा आणि आता लोकसभेतही तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली असून, अनेक बडे नेते ममतांची साथ सोडत आहेत. पण, बॉलीवूड अभिनेते आणि पक्षाचे खासदार शत्रूघ्न सिन्हा यांनी पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. “मी ममता बॅनर्जी यांच्याबरोबर होतो, आहे आणि यापुढेही राहीन. सध्या तरी माझा दुसरा विचार माझ्या मनात नाही,” अशा शब्दांत सिन्हा यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ’एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना शत्रूघ्न सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादावर भाष्य केले.
अभिषेक बॅनर्जी माझे नेते नाहीत – शत्रूघ्न सिन्हा
शत्रूघ्न सिन्हा यांनी पक्षाअंतर्गत वादावर बोलताना अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक जण बंड करत असून, वेगळ्या गटात सामील होत असल्याचा उल्लेख केला. “बंडखोरांबरोबर जाण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. कदाचित काही जण प्रलोभनाला बळी पडून जात असतील, तर काही जण भीतीपोटी जात असतील. काही जण तर केवळ मजबुरीमुळे जात आहेत. त्यामुळे माझी त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. परंतु, तृणमूल काँग्रेसमध्ये तुम्ही ज्या अभिषेक बॅनर्जी किंवा इतर नेत्यांचा उल्लेख करत आहात, त्यापैकी कोणीही माझा नेता नाही. माझ्या नेत्या केवळ आणि केवळ ममता बॅनर्जी आहेत,” असे शत्रूघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केले.
तक्रार करण्याची हीच योग्य वेळ होती का? सिन्हा यांचा सवाल
“हे सर्व लोक माझे सहकारी राहिले आहेत आणि त्यातील अनेक जण माझ्यापेक्षा वयाने व अनुभवाने लहान आहेत. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत बाबींवर मी कोणतीही टीका-टीप्पणी करणार नाही. मात्र, जे लोक बंडखोर गटात गेले आहेत, त्यांनी विचार करायला हवा होता की पक्षाविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचण्याची हीच योग्य वेळ होती का?”, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला.
‘एकला चलो रे’ प्रमाणे ममतांबरोबर राहणार
“पक्षातील काही खासदार किंवा नेत्या स्वतःला ममता बॅनर्जींची ‘कॉपी कॅट’ म्हणवून घ्यायच्या, त्यांच्यासारखीच नक्कल करायच्या. त्याच व्यक्ती दीदींच्या विरोधात बोलत आहेत. अचानक असे काय घडले? त्यांनी या समस्या आधी का मांडल्या नाहीत? निवडणुकीतील पराभव तात्पुरता आहे. सध्याची वेळ एकजूट दाखवण्याची होती, तक्रारी करण्याची नव्हती,” असे शब्दात सिन्हा यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना खडसावले. शत्रूघ्न यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्याबरोबर राहणे हाच सर्वात योग्य निर्णय आहे, असल्याचे मत मांडले. “पक्षात एकटा उरलो, तरीही रवींद्रनाथ टागोरांच्या ‘एकला चलो रे’ या भूमिकेप्रमाणे मी त्यांच्याबरोबर ठाम राहीन”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
