Mamata Banerjee TMC Crisis as Chandrima Bhattacharya Resigns: महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींचे आमदार आणि खासदार फुटले. त्यानंतर आता पक्षातील पदाधिकारीही पक्ष सोडून जात आहेत. महिन्याभरापूर्वी ममता बॅनर्जी यांनी संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल केले होते. ३ जून रोजी त्यांनी माजी मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. मात्र भट्टाचार्य यांनी महिन्याभरातच आपल्या पदासह पक्षाचा राजीनामा दिला आहे.
चंद्रिमा भट्टाचार्य यांनी बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते ऋतब्रता बॅनर्जी यांच्या गटात प्रवेश केला आहे. जिथे श्रद्धा, विश्वास नाही, तिथे काम करणे शक्य नाही. म्हणूनच मी सर्व पदांचा राजीनामा देत आहे, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. राजीनामा दिल्यानंतर त्या लगेचच ऋतब्रता बॅनर्जी यांच्या दालनात गेल्या आणि त्यांची भेट घेतली.
ममता बॅनर्जी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले, दि. ३ जून २०२६ रोजी कालीघाट येथे झालेल्या सभेत माझ्यावर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या पदासह मी पक्षाच्या इतर सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. विविध बँकांमधील खात्यांच्या संदर्भात आणि इतर संबंधित संघटनांच्या अधिकृत स्वाक्षरीकर्ता म्हणूनही मी माझे नाव मागे घेत आहे. भारतीय निवडणूक आयोगालाही यासंबंधीची माहिती देत आहे.
चंद्रिमा भट्टाचार्य यांचा मुलगा सौरव बसू हा ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाल्यानंतर भट्टाचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भट्टाचार्य या ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती मानल्या जात होत्या. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नेत्यांचा विरोध असूनही ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवले होते.
‘मी अजून जिवंत आहे’ – ममता बॅनर्जी
दरम्यान, ममता बॅनर्जी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना त्यांनी गद्दार असल्याचे म्हटले. भाजपाच्या इशाऱ्यावर हे नेते वागत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. ज्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढवली, ते काही महिन्यांतच पक्षाच्या विरोधात कसे काय जाऊ शकतात? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बंडखोरांना इशारा देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “लक्षात ठेवा मी अजून जिवंत आहे.” तसेच या पडझडीच्या काळात ते नेते व कार्यकर्ते पक्षाबरोबर राहिले आहेत. त्यांच्याप्रती ममता बॅनर्जी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पक्षाचे चिन्ह कुठेही जाणार नाही. मला जर कोणी थांबवू इच्छित असेल तर त्यांना आधी माझी हत्या करावी लागेल, अशीही भावनिक साद ममता बॅनर्जी यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना घातली.
