पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचंड चर्चेत आलेले तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार आणि बाहुबली नेते जहांगीर खान यांना अखेर पश्चिम बंगाल पोलिसांनी नेपाळ सीमेजवळून अटक केली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने जहांगीर खान यांना अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण वाढवण्यास नकार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जहांगीर खान हे ‘फाल्टा’ मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, या मतदारसंघात मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने येथे २१ मे रोजी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले होते.
जहांगीर खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना २६ मे पर्यंत दिलासा दिला होता, जेणेकरून ते निवडणुकीत भाग घेऊ शकतील. मात्र, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे संरक्षण वाढवण्यास नकार दिला. न्यायालयाने दिलासा नाकारताच पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम आखली आणि त्यांना नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले.
सुवेंदु अधिकारी आणि ‘पुष्पा’ संवाद
या निवडणुकीत जहांगीर खान यांच्या अटकेपेक्षाही राजकीय सवाल-जबाब अधिक रंगला. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांची नियुक्ती केली होती. जहांगीर खान यांनी स्वतःची तुलना अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील तस्कराशी केली होती, तर या पोलीस अधिकाऱ्याला ‘सिंघम’ म्हटले होते.
यावर उत्तर देताना, भाजपाचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी १६ मे रोजी जाहीर सभेत जहांगीर खान यांना इशारा दिला होता. अधिकारी म्हणाले होते, “हा एक कुख्यात गुन्हेगार असून या ‘पुष्पा’ कडे मी स्वतः लक्ष देणार आहे. ही माझी जबाबदारी आहे.” मुख्यमंत्र्यांनी फाल्टाच्या जनतेला भाजप उमेदवाराला १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले होते.
भाजपचा ऐतिहासिक विजय
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर जहांगीर खान यांनी मतदानाच्या अवघ्या ४८ तास आधी निवडणुकीतून माघार घेतली. २१ मे रोजी झालेल्या पुनर्मतदानात तब्बल ८८% मतदान झाले. केंद्रीय दलांच्या कडक बंदोबस्तात नागरिकांनी ‘भीतीशिवाय’ मतदान केले.
याचा परिणाम असा झाला की, भाजपचे उमेदवार देवांशू पांडा यांनी तब्बल १,०९,०२१ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. फाल्टा मतदारसंघात भाजपची मतटक्केवारी २०२१ मधील ३६.७% वरून थेट ७१.२% वर पोहोचली, तर तृणमूल काँग्रेसचा या जागेवर पूर्णपणे सुपडासाफ झाला.
