देशात सध्या दोन व्यक्ती वादात अडकल्या असून त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे गदारोळ माजला आहे. पहिली व्यक्ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, तर दुसरी व्यक्ती आहे प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दास. कंगना रणौतने स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत त्यांना सत्तेची हाव होती असं म्हटलं आहे, तर दुसरीकडे वीर दासच्या ‘टू इंडियाज’ व्हिडीओवरुन वाद निर्माण झाला आहे. वीर दासविरोधात अनेक राजकीय नेत्यांनी नाराजी जाहीर केली असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी मात्र त्याला पाठिंबा दिला आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत महुआ मोईत्रा यांना वीर दासला पाठिंबा देताना कंगनाला मात्र देण्यात आला नसल्याचं कारण विचारण्यात आलं. वीर दासला दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा प्रश्न वीर दासला समर्थन देणं अथवा न देण्यासंबंधी नाही. तर वीर दास जे सांगत आहे ते योग्य सांगत आहे. मी त्याला ओळखत नाही, किंवा पाठिंबाही देत नाही. पण त्याने जे सांगितलं आहे त्यात तथ्य नसून चुकीचं आहे हे कोणी सिद्ध करुन दाखवावं इतकंच माझं आव्हान आहे. कारण त्याने जे सांगितलं ती सत्य परिस्थिती आहे”.

कंगनाचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, महात्मा गांधींवर साधला निशाणा; म्हणाली “सत्तेची हाव असणाऱ्यांनी…”

वीर दास जगासमोर भारताची प्रतिमा मलीन करत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “त्यातील एकाच गोष्टीत तथ्य नाही ती म्हणजे दिवसाढवळ्यादेखील महिलांवर सामूहिक बलात्कार होतात. ज्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत त्यांनी २०२० मधील गुन्हेगारी आकडेवारी पहायला हवी. भारतात दिवसाला ८८ बलात्कार झाले आहेत. हे होत असेल तर ठीक, पण त्याबद्दल कोणी बोललं तर मात्र आक्षेप घेणं भयानक आहे”.

एकपात्री विनोदकार वीर दास यांच्याविरोधात तक्रार ; ‘टू इंडियाज’ या चित्रफितीविरोधात टीका

“कोणतीही सीमा नसणाऱ्या जगात आपण वावरत आहोत, त्यामुळे विदेशातील भूमीवर असं काही नाही. हे डिजिटल युग असून अशावेळी खरंच याचा काही संबंध आहे का? मग त्याने ते केनेडी सेंटरमध्ये बोललं असावं अथवा त्याच्या बेडरुममध्ये रेकॉर्ड करुन फेसबुकवर अपलोड केलं असावं? मी शेवटचं युट्यूबला पाहिलं तेव्हा त्या व्हिडीओला १० लाख व्ह्यूज होते. जर मी माझं नाव सांगितलं तर कोणीतरी हे मद्याचं नाव असल्याचं सांगू शकतं. हे माझ्यासाठी आक्षेपार्ह आहे. तुमच्या पालकांनी सीता नाव का ठेवलं नाही?,” असंही यावेळी महुआ मोईत्रा यांनी म्हटलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “उद्या जर मी माझ्या मुलाचं नाव येशू ठेवलं तर कोणीतरी म्हणेल की, तुम्ही तर हिंदू ब्राह्मण कुटुंबातील आहात, राम नाव का ठेवत नाही?”.

यावेळी त्यांना कंगना रणौतलाही विरोध होत असून तक्रारी दाखल केल्या जात आहेत, मात्र तिला पाठिंबा मिळत नाही असं विचारण्यात आलं असता उत्तर दिलं की, “माफ करा, म्हणजे मी प्रत्येक मुर्खासाठी उभं राहायला हवं का? योग्य विचार करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी मला लोकांनी निवडून दिलं आहे. प्रत्येक मुर्खाला पाठिंबा देणं हे संघाचं काम आहे. त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे माणसं आहेत”.