संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी पंतप्रधानांवर ‘ड्रामेबाजी’चा आरोप करत जोरदार निशाणा साधला आहे. “महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच मंजूर झाले असून दोन दिवसांपूर्वीच त्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, मग त्याच्या अंमलबजावणीसाठी आता कसली वाट पाहत आहात?” असा सवाल मोइत्रा यांनी उपस्थित केला आहे.

‘ड्रामेबाजीने सत्य लपणार नाही’

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका मांडताना खासदार महुआ मोइत्रा यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “तुमची ड्रामेबाजी आणि गोदी मीडियाची स्क्रिप्ट सत्य लपवू शकणार नाही. महिला आरक्षण २०२३ मध्येच मंजूर झाले आहे. तुम्हाला आता हे विधेयक लागू करण्यापासून आणि लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १/३ जागा महिलांना देण्यापासून कोणीही रोखलेले नाही. तृणमूल काँग्रेसने आधीच महिलांना ३३% उमेदवारी देऊन हे करून दाखवले आहे, मग भाजपला काय अडचण आहे?”

भाजपच्या बहुमतावर आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी सुध्दा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रियो यांच्या मते, घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत भाजप सरकारकडे नव्हते.

महिला आरक्षणाचे विधेयक ‘जनगणना’ आणि सीमा रचना या प्रक्रियांशी जोडणे ही नैतिकदृष्ट्या चुकीची आणि अनैतिक बाब आहे. लोकशाही देशात दूरदर्शन सारख्या सरकारी साधनांचा वापर राजकीय स्पष्टीकरण देण्यासाठी करणे हे अभूतपूर्व आणि चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंख्य राजकीय सभा घेतल्या आहेत, मग या विषयावर बोलण्यासाठी त्यांनी सरकारी माध्यमांऐवजी राजकीय व्यासपीठाचा वापर का केला नाही? असा सवालही सुप्रियो यांनी उपस्थित केला.

नेमका वाद काय?

महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन अधिनियम) संसदेत मंजूर झाले असले तरी, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आगामी जनगणना आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर होणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. विरोधकांच्या मते, ही अट म्हणजे केवळ वेळकाढूपणा असून केंद्र सरकारला हे आरक्षण तातडीने लागू करायचे नाही. याच मुद्द्यावरून आता तृणमूल काँग्रेससह संपूर्ण विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.