गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ३० मे रोजी हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही त्यांच्याच मतदारसंघात हल्ला झाल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही हल्ल्याच्या घटनांवरून ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यातच आज (३१ मे) तृणमूल काँग्रेस पक्षाच्यावतीने एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या बंगालमधील ८० आमदारांपैकी तब्बल ६० आमदारांनी दांडी मारल्याची चर्चा आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी होणारी ही बैठक अखेर रद्द करावी लागल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलं आहे.

तृणमूल काँग्रेसने काय स्पष्टीकरण दिलं?

ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला जवळपास ६० आमदारांनी दांडी मारणं हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्यांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवल्यानंतर अखेर तृणमूल काँग्रेसला ही बैठक रद्द करावी लागली. त्यानंतर ही बैठक रद्द का करावी लागली? याबाबत पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे पक्षाचे नेते व्यस्त असल्याचं कारण देण्यात आलं आहे.

दरम्यान, टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी दावा केला की, पक्षाचे दोन दिग्गज नेते अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यांच्या घटनेमुळे काही आमदार बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत आणि इतर काही आमदार नियोजित दौऱ्यांमध्ये आणि कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तेही बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.