केंद्रात भाजपाची सत्ता असून अनेक राज्यांमध्ये देखील भाजपाची एकहाती सत्ता किंवा सत्तेत वाटा आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपा ओळखला जात असताना आता भाजपालाच येत्या तीन वर्षांत देशाच्या बाहेर काढण्याचा निश्चय तृणमूल काँग्रेसनं केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी स्थानिक पोटनिवडणुकांच्या प्रचारादरम्यान ही घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुका होत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात देखील पोटनिवडणूक होत आहे. यादरम्यान, मुर्शिदाबाद मतदारसंघात प्रचार करताना अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपाला देशाबाहेर काढण्याचं लक्ष्य असल्याचं जाहीर केलं आहे.

अभिषेक मुखर्जी आज पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये प्रचार करत होते. या ठिकाणी मुर्शिदाबाद-समशेरगंज आणि जांगीपूर या दोन ठिकाणी ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान उमेदवाराचाच मृत्यू ओढवल्यामुळे या मतदारसंघातली निवडणूक स्थगित करण्यात आली होती. तिथे आता पोटनिवडणूक घेतली जात आहे.

“त्यांची ईडी-सीबीआय काय करणार आहे”

अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि ईडी-सीबीआय चौकशीवर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. “येत्या ३ वर्षांत भाजपाला देशाबाहेर हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे. मी भाजपाच्या प्रत्येक मतदारसंघात जाईन आणि तिथून त्यांना हाकलून लावेन. त्यांच्या ईडी आणि सीबीआय माझं काय करून घेणार आहेत?” असं आव्हानच अभिषेक बॅनर्जी यांनी दिलं आहे. “आम्ही भाजपाचं अस्तित्व असलेल्या प्रत्येक राज्यात जाऊ आणि त्यांच्याशी लढा देऊ. ‘खेला’ आसाम आणि त्रिपुरामध्ये सुरू झाला आहे”, असं देखील बॅनर्जी म्हणाले.

“..तर मुर्शिदाबादचं मोदीशाहबाद झालं असतं”

“भाजपाचा विकास हा फक्त नावं बदलण्यापर्यंतच मर्यादित आहे. जर ते इथे जिंकले असते, तर मुर्शिदाबादचं नामकरण मोदीशाहबाद झालं असतं”, अशा शब्दांत अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर खोचक टीका केली आहे.

“काँग्रेस भाजपाकडून पराभूत होतेय आणि…”

दरम्यान, यावेळी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसवर देखील टीका केली. “काँग्रेस फक्त भाषण देऊ शकते. त्यांचे नेते परदेशवाऱ्या करण्यात व्यग्र आहेत. रस्त्यावर उतरून काँग्रेस काम करू शकते का? त्यांचे खासदार तुम्हाला रस्त्यावर दिसतात का? काँग्रेस भाजपाला हरवेल का? एक महत्त्वाचा फरक हा आहे, की काँग्रेस भाजपाकडून पराभूत होत आहे आणि आम्ही भाजपाला पराभूत करत आहोत”, असं अभिषेक बॅनर्जी यावेळी म्हणाले.