पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अनेक खासदार, आमदार, नगरसेवक आणि पक्षातील काही नेते ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज आहेत. यातच जवळपास १०० पेक्षा जास्त नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. तसेच खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी देखील तृणमूल काँग्रेसच्या सर्व संघटनात्मक पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

काकोली घोष दस्तीदार यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिल्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी थेट लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहित तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून तृणमूलमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

काकोली घोष दस्तीदार यांनी पत्रात काय म्हटलं?

खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं. त्यामध्ये टीएमसी पक्षाचे नेते तथा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच काकोली घोष दस्तीदार यांनी या पत्राच्या माध्यमातून कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

काकोली घोष दस्तीदार यांनी म्हटलं की, “कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेत माझा शाब्दिक अपमान केला. त्यामुळे कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी मी आपली परवानगी मागत आहे. हा स्त्रीद्वेष अनेक महिला सदस्यांच्या विरुद्धही झाला आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे”, असं काकोली घोष दस्तीदार यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

राजीनामा दिल्याच्या दुसऱ्या दिवशीच TMC च्या नेत्यावर गंभीर आरोप

खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व संघटनात्मक पदांचा बुधवारी राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी कल्याण बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाच्या संघटनेचा राजीनामा देतानाही काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षाच्या एका खासदाराकडून ‘अशोभनीय वर्तन’ करण्यात आल्याचा आरोप केला होता.

कल्याण बॅनर्जी यांनी काय प्रतिक्रिया दिली?

खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी ओम बिर्ला यांना पत्र लिहित खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “सभागृहात काही घडल्यानंतर अध्यक्षांना तात्काळ कळवलं पाहिजे हा नियम आहे. कोणतीही घटना विनाविलंब अध्यक्षांना कळवली पाहिजे. पण आता जे आरोप केले जात आहेत, त्याबद्दल प्रश्न हा आहे की कोणी काय आणि केव्हा म्हटलं? आता असं दिसून येत आहे की त्या एका विशिष्ट हेतूने आरोप करत आहेत. त्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण होते.”

तृणमूलच्या सर्व पदांचा दिला राजीनामा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत तृणमूल काँग्रेसच्या सर्व पदांचा बुधवारी राजीनामा दिला. खासदार काकोली घोष दस्तीदार यांना ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखलं जात होतं. मात्र, आता तृणमूलच्या सर्व पदांचा काकोली घोष यांनी अचानक राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनाम्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

खासदार काकोली घोष दस्तीदार या परगणा जिल्ह्यातील बारासात लोकसभा मतदारसंघामधून चार वेळा खासदार राहिल्या आहेत. मात्र, काकोली घोष दस्तीदार या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्या बैठकीच्या काही तासानंतर लगेच त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

Kakoli Ghosh Dastidar Om Birla letter Kalyan Banerjee TMC

राजीनामा देताना काय म्हटलं होतं?

काकोली घोष दस्तीदार यांनी पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुब्रता बक्षी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात घोष यांनी म्हटलं होतं की, “आपण विचार केल्यानंतरच पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यंत दुःखद अंतकरणाने मी अखिल भारतीय तृणमूल महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा, तसेच पक्षातील इतर सर्व संघटनात्मक पदे आणि समित्या व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत आहे. अशा पदावर राहण्यात काही अर्थ नाही. जिथे पक्षाच्या दुसऱ्या एका उद्धट खासदारांचं महिला खासदाराबरोबरचं असभ्य वर्तन थांबवता येत नाही, किंवा वरिष्ठ नेतृत्वाचं सहकार्य मिळत नाही”, असं म्हणत काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षावर अप्रत्यक्ष टीका केली होती.

खासदारकीचा राजीनामा नाही

काकोली घोष दस्तीदार यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला असला तरी खासदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही. याचबरोबर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला नाही. फक्त तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिलेला आहे.