Yusuf Pathan Reaction on Resign Rumor: तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव आणि त्यानंतर पक्षातील आमदारांनी केलेल्या बंडामुळे पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची राजकीय अस्तित्वाची लढाई सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी त्यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे त्यांना आता पोटनिवडणुकीद्वारे लोकसभेत पाठविण्याची योजना पक्षातील काही नेते आखत होते. यासाठी बेरहामपूरचे खासदार युसूफ पठाण यांना राजीनामा देण्याचा संदेश सौरव गांगुली यांच्यामार्फत पाठवल्याचे वृत्त बाहेर आले. यानंतर बंगालमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली. आता खुद्द युसूफ पठाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार युसूफ पठाण यांनी व्हिडीओद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. ते म्हणाले, माझ्या राजीनाम्याबाबतच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने त्यांना राजीनामा देऊन मतदारसंघ रिक्त करण्यासंदर्भात संपर्क साधलेला नाही.
“ममता बॅनर्जी यांनी मला बेहरामपूरच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला सांगितला. जेणेकरून त्यांना तिथून लोकसभा निवडणूक लढवता येईल. अशी बातमी काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. पण ममता बॅनर्जी यांनी मला कधीही याबाबत काही सांगितलेले नाही. तसेच त्यांनी पक्षाच्या कोणत्याही अधिकृत नेत्यांकडून असा संदेश पाठवला”, अशी प्रतिक्रिया युसूफ पठाण यांनी दिली.
#WATCH | TMC MP Yusuf Pathan says, "For quite some time now, a piece of news has been going viral claiming that Mamata Banerjee asked me to resign from my MP seat, Berhampore Lok Sabha constituency, so that she could contest the election from there. Mamata Banerjee never spoke to… pic.twitter.com/Z0B6W05tfY
— ANI (@ANI) June 6, 2026
तसेच राजीनाम्याच्या चर्चांना फेटाळून लावताना ते म्हणाले, “ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. मला दुःख होते की, कोणत्याही तथ्याशिवाय अनेक माध्यमांवर सदर बातमीची चर्चा होत आहे. मला कुणीही खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगितलेले नाही.”
नेमके प्रकरण काय?
बंगालमधील एका दैनिकाने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधी बातमी दिली होती. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या मध्यस्थीने खासदार युसूफ पठाण यांची समजूत घालून त्यांना राजीनामा देण्यासाठी संदेश पोहोचवल्याचा दावा वृत्तात करण्यात आला होता. मात्र सौरव गांगुली यांनी या वृत्ताच्या विरोधात एक पत्रक काढले आणि सदर वृत्त बिनबुडाचे असल्याचे जाहीर केले.
‘सत्याकडे कानाडोळा करून बेजबाबदारपणे पसरवलेली चर्चा’, अशा शब्दात गांगुली यांनी सदर वृत्त फेटाळून लावले. “या बातमीतील आरोप माझ्याशी संबंधित आहेत. पण ते सत्याकडे कानाडोळा करून बिनबुडाच्या आधारावर रचलेले आहेत. ममता बॅनर्जी यांनी युसूफ पठाणपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवण्याची कोणतीही विनंती माझ्याकडे केली नाही. तसेच या विषयासंदर्भात आपण पठाणशी कधीही संपर्क साधला नाही”, असे स्पष्टीकरण गांगुली यांनी दिले.
