TMC political crisis 20 MP likely to join BJP: विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. विधानसभा आमदारांनी बंड पुकारल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे खासदार देखील ममतांना जोर का धक्का देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे तब्बल वीस खासदार भाजपात पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

२० खासदार भाजपाच्या वाटेवर – सूत्र

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसचे २० खासदार भाजपात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी उच्च स्तरावर विविध बैठका आणि चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा आणि लोकसभा मिळून ४१ खासदार आहेत. पैकी २८ खासदार लोकसभा आणि १३ खासदार राज्यसभेत आहेत. जर पक्ष फुटला तर अंतर्गत बंडखोरी शमविण्यासाठी धडपडणाऱ्या ममता बॅनर्जींना हा मोठा धक्का असेल. विधानसभेच्या निकालानंतर तृणमूलमध्ये अंतर्गत वादाने तोंड वर काढले आहे.

फूट पडल्यास ममतांना धक्का

विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये नेत्यांनी पक्षाचे धोरण आणि भूमिकेवर टीका करण्यास सुरुवात केली. अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली. विधानसभा आमदार तर हा विरोध एक पायरी वर घेऊन गेले. अशात पक्षाच्या संसदेच्या गटात फूट पडल्यास ममतांना हा खूप मोठा धक्का मानला जाईल. विरोधकांमध्ये काँग्रेसनंतर सर्वाधिक खासदार असणारा ममता बॅनर्जी यांचा मोठा पक्ष आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यास पक्षासह विरोधी गटासाठी देखील हा मोठा धक्का असेल.

६० आमदारांची बंडखोरी

बंगालमधील तृणमूल विधिमंडळ पक्ष आधीच दोन भागांत विभागला गेला आहे. आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ६० आमदारांच्या एका बंडखोर गटाने स्वतःला खरे तृणमूल काँग्रेस म्हणून घोषित केले आहे. या गटाने ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली असून, त्यासाठी विधानसभा अध्यक्षांची मंजुरीही मिळवली आहे. ऋतब्रता यांच्या नेतृत्वाखाली या सदस्यांनी उघडपणे ममता बॅनर्जी यांच्याविरोधात शड्डू ठोकत त्यांना उघड आव्हान दिले आहे.

लवकरच पक्षफुटीची शक्यता

नेत्यांनी पक्षातील भ्रष्टाचार, आर.जी.कर बलात्कार आणि खून प्रकरण यावरुन टीका केली आहे. तृणमूलच्या अनेकांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बोलावलेल्या गेल्या आठवड्यातील बैठकीला देखील हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने पक्षाच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, येत्या काही दिवसांत पक्षात लोकसभा आणि राज्यसभेत देखील फूट पडू शकते. यामुळे ममता बॅनर्जी आता पक्षाचे नाव आणि चिन्ह कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील असे सांगितले जात आहे. दरम्यान, पक्षातील फूट रोखण्यास असमर्थ ठरणाऱ्या ममतांचे पक्षावरील नियंत्रण सूटत चालेले आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.