पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवानंतर पक्षात उभी फूट पडली. विधानसभा आणि संसदेत देखील पक्षात फूट पडली. विधानसभेत आमदारांना वेगळा गट स्थापन केला तर, २० खासदारांनी जूनमध्ये फारशा परिचित नसलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. यानंतर आता या २० बंडखोर खासदारांपैकी एक असलेल्या जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी त्यांच्यापैकी १७ जण ऑक्टोबरमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. दुर्गापूजेपूर्वीच हा पक्षप्रवेश होईल असेही बसुनिया यांनी म्हटले आहे.

जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांचा दावा काय?

“सुरुवातीलाच थेट भाजपात प्रवेश करण्याचा प्लॅन होता असेही बसुनिया म्हणाले. सुरुवातीला थेट भाजपमध्ये सामील होण्याची योजना होती, परंतु अबू ताहेर आणि इतर दोन खासदारांच्या आक्षेपांमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे एनसीपीआयमध्ये प्रवेश केला”, असे बसुनिया म्हणाले. एनसीपीआय हा एक अमान्यताप्राप्त पक्ष आहे, पक्षाने त्रिपुरामध्ये विधानसभेच्या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. एनसीपीआयबद्दल काहीच माहिती नव्हती असेही बसुनिया म्हटले आहे.

बसुनियांच्या दाव्यावर इतर खासदारांच्या प्रतिक्रिया

जगदीश चंद्र बर्मा बसुनिया कूचबिहारचे प्रतिनिधित्व करतात. “एनसीपीआयचे १७ खासदार भाजपामध्ये सामील होतील. इतर जे करतील, त्याचे मलाही अनुसरण करावे लागेल,” असे बसुनिया म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारे खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे सत्ताधारी गटाचा घटक असलेल्या एनसीपीआयमध्ये सामील झाले असले तरी, आतापर्यंत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकांपासून दूर राहिले आहेत.

भाजपा प्रवेशाची कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण

बसुनिया यांनी भाजपात प्रवेशाचे संकेत दिल्यानंतर आता फुटीर गटाचे खासदारही प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. “बसुनिया यांना आमच्या वतीने बोलण्याचा कोणीही अधिकार दिलेला नाही. अनेकवेळा सांगितलंय आम्ही भाजपात जाणार नाही”, असे खान म्हणाले. शताब्दी रॉय यांनी देखील बसुनिया यांच्या अशा कोणत्याही वक्तव्याची कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. असा काही निर्णय झाल्याचे मला माहिती नाही, असे रॉय म्हणाल्या. अरुप चक्रवर्ती यांनी देखील अशाप्रकारच्या निर्णयाची कल्पना नसल्याचे सांगितले.

भाजपाची प्रतिक्रिया

पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी फुटीर खासदारांच्या प्रवेशावर स्पष्ट भाष्य केले नाही मात्र, शक्यताही नाकारली नाही. “कोणालाही भाजपात प्रवेश करायचा असेल. पण त्यांच्या प्रवेशाचा निर्णय सर्वोच्च स्तरावर घेतला जातो,” असे भट्टाचार्य म्हणाले.