TMC rebel MPs merge Nationalist Citizens Party India: ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या २० बंडखोर खासदारांनी रविवारी आपला गट ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (एनसीपी) या फारशा परिचित नसलेल्या पक्षात विलीन करून एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन, एनसीपी पक्षात विलीन होण्याचा आणि भाजपप्रणित आघाडीला दिलेल्या पाठिंब्याचे पत्र दिले. सूत्रांनुसार, स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्यातील कायदेशीर गुंतागुंतीमुळे बंडखोर टीएमसी खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाबरोबर जाण्याचा पर्याय निवडला.
एनसीपीत सामील, भाजपाला पाठिंबा
“आम्ही ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ पक्षात सामील झालो आहोत. तो एक मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष आहे. आम्ही त्यात विलीन झालो आहोत. खरी टीएमसी कोणती, हे न्यायालयात ठरवले जाईल,” असे टीएमसीचे बंडखोर खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी म्हणत ममतांना न्यायालयीन लढ्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर नवी दिल्लीतील सभापतींच्या निवासस्थानी बंडखोर गट पुन्हा एकत्र आला. यानंतर काही तासांनंतर २० बंडखोर खासदारांनी ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ पक्षात सामील होण्याची निर्णय घेतला.
अमित शाह, भूपेंद्र यादव यांच्या भेट
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून, “तृणमूल काँग्रेसला एकच राजकीय पक्ष म्हणून ग्राह्य धरण्याचे आणि कोणत्याही वेगळ्या गटाला मान्यता न देण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी यांचे विश्वासू नेते बंडोपाध्याय यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याबरोबर झालेल्या बैठकांनंतर बंडखोरांच्या गटात सामील होण्याचा निर्णय जाहीर केल्याने, या गटाला मोठे बळ मिळाले. बंडखोर खासदार आणि आमदारांच्या आवाहनानंतर त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे बंडोपाध्याय यांनी सांगितले.
पक्षात मोठे बदल
पीटीआयच्या वृत्तानुसार, माजी केंद्रीय मंत्री लवकरच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर, बंडोपाध्याय यांनी ममतांची साथ सोडल्यानंतर काही तासांतच, टीएमसीने बंडखोर सयोनी घोष, माला रॉय आणि बंडोपाध्याय यांना पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून हटवून संघटनात्मक फेरबदल केला. घोष यांच्या जागी अर्णब बॅनर्जी यांची तृणमूल युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर पक्षाच्या महिला शाखेच्या प्रमुखपदी रॉय यांच्या जागी कालिगंजच्या आमदार अलिफा अहमद यांची नियुक्ती झाली आहे. बंडोपाध्याय यांच्या जागी टीएमसी नेते कुणाल घोष यांची पक्षाच्या उत्तर कोलकाता संघटनात्मक जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
