TMC Split Ritabrata Banerjee: तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. फुटीर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या ऋतब्रता बॅनर्जी यांच्या गटाने तृणमूल काँग्रेसच्या कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयाचा ताबा घेतला आहे. फुटीर गटाने मुख्य कार्यालयाचा ताबा मिळवून ममत बॅनर्जींना आणखी एक धक्का दिला आहे. फुटीर गटाचे कामकाज याच कार्यालयातून चालेल असेही या गटाने स्पष्ट केले आहे.
पोस्टर्सही बदलले
बंडखोर गटाने कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयाचा ताबा घेतल्यानंतर फिरहाद हकीम, संदीपान साहा, जावेद खान आणि पक्षाचे खजिनदार अक्रुझमान यांच्यासह अनेक आमदारांचे फोटो पोस्टर्स लावले आहेत. एवढेच नव्हे तर फुटीर गटाने कर्यालयाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप बदलले असून, नवीन पोस्टर्स लावले आहे. कार्यालयात प्रवेश घेतल्यानंतर फुटीर गटाने एक बैठक देखील घेतली, अशी माहिती समोर आली आहे. “तृणमूल काँग्रेसचे या कार्यालयाशी भावनिक नाते आहे. मालकांबरोबर करार पूर्ण झाला असून, कामकाज येथूनच पार पडेल”, असे अक्रुझमान यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर मुख्यालयाचा ताबा
बंडखोर आमदारांकडून पक्ष मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांचे तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे एक पोस्टरही लावण्यात आले आहे. ऋतब्रता बॅनर्जी यांनी शनिवारपासून पक्षाचे कामकाज या कार्यालयातून अधिकृतपणे सुरु होईल, असे सांगितले. “आम्ही तृणमूल काँग्रेस आहोत आणि आमच्या पक्षाचे मुख्यालय आहे”, असेही बॅनर्जी पुढे म्हणाले. दरम्यान, २०२२ पासून मूळ तृणमूल काँग्रेस पक्षाचे कामकाज येथूनच सुरु होते. ऋतब्रता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. फुटीर गटाने तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, पक्ष संघटनेवर दावा सांगितला आहे.
ममतांच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त
ऋतब्रता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आयोगाने दोन्ही गटांना पत्र लिहून कागदपत्रं आणि प्रतिदावे ०६ जुलै सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत दाखल करण्यास सांगितले आहे. बंडखोर आमदारांनी पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ममतांचे विश्वासू नेते कुणाल घोष कार्यालयाजवळ आले मात्र त्यांना तिथे टाळे लावल्याचे आढळून आले. घोष यांनी याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद केले.
