TMC Split West Bengal : पश्चिम बंगालमधील राजकारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ढवळून निघालं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर पक्षाला एकामागोमाग अनेक हादरे बसत आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. ५९ आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे आणि या गटाला विधानसभेत मान्यता देखील मिळाली आहे. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे १९ खासदार फुटले आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या १९ खासदारांनी बंड करत भाजपाप्रणित एनडीएला पाठिंबा दर्शवला आहे. या १९ खासदारांचा गट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान ‘आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत’, असा मोठा दावा बंडखोर खासदारांचा गट ओम बिर्ला यांच्याकडे करणार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे आता बंगालमधील राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता असून खरी तृणमूल काँग्रेस कुणाची? असा राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही राजकीय संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीटीआयच्या हवाल्याने न्यूज १८ ने संदर्भातील वृत्त दिलं आहे.
दरम्यान, बंडखोर खासदार जगदीश चंद्र बसुनिया यांनी सांगितलं की, बंडखोर खासदारांच्या गटाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना यापूर्वी एक निवेदन दिलं आहे. आता १५ जून रोजी खासदारांचा गट अधिकृतपणे आपला दावा करणार आहे. आम्ही अध्यक्षांकडे जाऊन खरी तृणमूल काँग्रेस आम्हीच आहोत, असा दावा करणार आहोत आणि आमच्या दाव्याला मान्यता देण्याची विनंती आम्ही ओम बिर्ला यांच्याकडे करणार आहोत”, असं जगदीश चंद्र बसुनिया यांनी सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
#WATCH | Delhi: Rebel TMC MP Jagadish Barma Basunia says, "We have been given a date for Monday (15th June) (for meeting with Lok Sabha Speaker). All (rebel) MPs will go to him, all of they are coming to Delhi tomorrow. A meeting of all MPs with CM (Suvendu Adhikari) will be held… pic.twitter.com/2I1TKdRNNe
— ANI (@ANI) June 12, 2026
टीएमसीच्या १९ बंडखोरांची यादी आली समोर
तृणमूल काँग्रेसमधील खासदारांच्या फुटीची बातमी समोर आल्यानंतर बंडखोरांच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेमधील एकूण २९ खासदार आहेत. बशीरहाटचे खासदार हाजी नुरुल इस्लाम यांचं निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त आहे. वेगळा गट स्थापन करायचा झाल्यास, सध्याच्या २८ पैकी बंडखोर गटाला २० खासदारांचा पाठिंबा लागेल. मात्र सध्या बंडखोर गटाकडे १९ खासदारांची स्वाक्षरी केलेली यादी आहे, असं सांगितले जातं. ही यादी लोकसभा अध्यक्षांना देण्यात आली असून काकोली घोष यांनी या गटाचा एनडीएला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.
तृणमूल काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षाला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड द्यावं लागत आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. पश्चिम बंगालमधील अनेक दशकांची डाव्या पक्षांची सत्ता तृणमूल काँग्रेसने उखडून फेकली. त्यानंतर तब्बल तीन टर्म ममता बॅनर्जी मुख्यमंत्री राहिल्या. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत पराभव होताच पक्षात बंड उफाळून आलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या सहकारी आणि ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी बंडखोर खासदारांच्या गटाचं नेतृत्व केलं आहे. काकोली घोष यांच्याबरोबर कोण कोण खासदार आहेत? याची चर्चा होती. आता या खासदारांची नावं समोर आले आहेत.
According to Sources here is the list of 19 out of 20 TMC breakaway MPs that sent their names to the Lok Sabha Speaker’s Office on May 18th.
— ANI (@ANI) June 12, 2026
1. Kakoli Ghosh Dastidar
2. Satabdi Roy
3. Bapi Haldar
4. Dr. Sharmila Sarkar
5. Prasun Bandyopadhyay
6. Jagadish Barma Basunia
7. Asit… pic.twitter.com/MM2rPhYuaf
यादी खालीलप्रमाणे (कंसात मतदारसंघाचे नाव):
१) काकोली घोष (बारासात)
२) जगदीशचंद्र बसुनिया (कूचबिहार)
३) युसूफ पठाण (बहरामपूर)
४) खलीलुर रहमान (जंगीपूर)
५) अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद)
६) पार्थ भौमिक (बैरकपूर)
७) बापी हलदर (मथुरापूर)
८) सायोनी घोष (जादवपूर)
९) माला रॉय (कोलकाता दक्षिण)
१०) मिताली बाग (आरामबाग)
११) दीपक अधिकारी (घाटल)
१२) कालीपद सोरेन (झाडग्राम)
१३) जून मालिया (मेदिनीपूर)
१४) अरूप चक्रवर्ती (बांकुरा)
१५) शर्मिला सरकार (वर्धमान पूर्व)
१६) असित कुमार माल (बोलपूर)
१७) शताब्दी रॉय (बीरभूम)
१८) रचना बॅनर्जी (हुगळी)
१९) प्रसून बंडोपाध्याय
दरम्यान, बंडखोर खासदारांनी तृणमूल काँग्रेसमधून तात्काळ राजीनामा न देण्याचा किंवा थेट भाजपामध्ये औपचारिकपणे सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी एनडीए सरकारला पाठिंबा देत स्वतंत्र गट म्हणून काम करण्याची त्यांची योजना असावी किंवा ‘आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत’, असा दावा या बंडखोर खासदारांच्या गटाकडून केला जाण्याची शक्यता आहे.
ममतांना भावी पंतप्रधान म्हणणाऱ्या सायोनी घोष बंडखोरांच्या गोटात?
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले. आधीच पक्षातील अनेक आमदार आणि खासदार बंडखोरीच्या तयारीत असतानाच त्यात आणखी एका नावाची भर पडल्याचे वृत्त समोर आले. तृणमूलच्या आक्रमक नेत्या तथा खासदार सायोनी घोष यादेखील बंडखोरांच्या गोटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या सर्वात निष्ठावान शिलेदार मानल्या जाणाऱ्या तरुण नेत्याच पक्षापासून दुरावत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सायोनी घोष कोण आहेत?
सायोनी घोष या बंगाली चित्रपट क्षेत्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. २०१० मध्ये त्यांनी अभियन क्षेत्रात पर्दापण केले आणि त्यानंतर अनेक यशस्वी बंगाली चित्रपटांमधून आपली ओळख निर्माण केली. २०२१ मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांना आसनसोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराने सायोनी यांचा दारुण पराभव केला. तरीदेखील २०२३ मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची पक्षाच्या युवा शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सायोनी घोष यांना जाधवपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, जिथे त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून वयाच्या ३१ व्या वर्षी संसदेत प्रवेश केला. अलीकडेच सायोनी यांची पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदीही नियुक्तीही झाली. तृणमूल काँग्रेसमधील सर्वात सशक्त आणि तरुण नेत्या म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाली.
