Mamata Banerjee TMC Crisis: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला मोठी गळती लागली आहे. पक्षात सुरू असलेले हे बंड थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या चार दिवसांत पक्षाच्या आणखी एका राज्यसभा खासदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूलचे उत्तर बंगालमधील बडे नेते प्रकाश चिक बरैक यांनी खासदारकी सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चार दिवसांतील हा तिसरा राजीनामा असून, तृणमूल काँग्रेस आता पूर्णपणे बॅकफूटवर आली आहे.
या राजीनामा सत्रामुळे राज्यसभेत १३ खासदार असणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे संख्याबळ आता १० वर घसरले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत तृणमूलचे आणखी किमान तीन खासदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे.
‘जनमताचा आदर करत घेतला निर्णय’ – प्रकाश बरैक
प्रकाश चिक बरैक यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. “मी माझ्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असून तो तात्काळ मंजूर करावा,” असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बरैक यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. ते म्हणाले, “पश्चिम बंगालमधील जनतेने तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला नाही. माझ्या मतदारसंघातही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. हा कौल थेट भाजपच्या बाजूने आहे. या जनमताचा आदर करूनच मी तृणमूल काँग्रेस आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.” आपल्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल बोलताना, “माझे राजकीय भविष्य उज्ज्वल असून योग्य वेळ आल्यावर पुढचा निर्णय घेईन,” असे सूचक विधानही त्यांनी केले.

४ दिवसांत ३ मोठे झटके; तृणमूलचे संख्याबळ घटले
तृणमूल काँग्रेसमधील या मोठ्या पडझडीची सुरुवात या आठवड्याच्या सुरुवातीला झाली. अवघ्या चार दिवसांत पक्षाने आपले तीन महत्त्वाचे खासदार गमावले आहेत:
- सुखेंदु शेखर रॉय: सोमवारी तृणमूलचे ज्येष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय यांनी खासदारकी आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे नाराज होऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. बंगालमधील तृणमूलच्या १५ वर्षांच्या राजवटीत भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार आणि कायदा-सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था यामुळे जनतेने बदल घडवला, असेही ते म्हणाले.
- सुश्मिता देव: आसाममधील तृणमूलचा मुख्य चेहरा असलेल्या सुश्मिता देव यांनी दुसरा झटका दिला. २०२१ मध्ये काँग्रेसमधून तृणमूलमध्ये आलेल्या सुश्मिता यांनी राजीनामा देताच आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांची भेट घेतली. त्यामुळे त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
- प्रकाश चिक बरैक: गुरुवारी बरैक यांनी राजीनामा देत या गळतीमध्ये तिसरी भर घातली.
…म्हणून सुरू आहे तृणमूलमध्ये बंड?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. पक्षातील वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे अपयश यांमुळे जनतेने नाकारल्याची भावना आता पक्षातील नेत्यांमध्येच निर्माण होऊ लागली आहे. एकापाठोपाठ एक खासदार पक्ष सोडत असल्याने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या अस्तित्वावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात ही पडझड रोखणे तृणमूलसाठी मोठे आव्हान असणार आहे.
