भाजपने पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून इतक्या कमी वेळात अभिषेक यांच्याकडे १०० कोटींचा बंगला खरेदी करण्यासाठी पैसा कुठून आला असा सवाल केला आहे. एका वाहिनीने अभिषेक यांनी बनावट (शेल) कंपन्यांच्या माध्यमातून काळ्या पैशाचे व्यवहार केल्याचा आरोपही केला होता. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) म्हणजे ‘टोटल ममता करप्शन’ पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जींवर टीकास्त्र सोडले.

दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही अभिषेक बॅनर्जींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ममता यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हणजे रॉबर्ट वड्रा आणि तेजस्वी यादव यांच्याप्रमाणेच असल्याचे त्यांनी म्हटले. अभिषेक यांची ‘लिप्स अँड बाऊंड्स प्रा. लि.’ या कंपनीची काही महत्वाची कागदपत्रे एका वाहिनीच्या हाती लागली आहेत. यातून हे स्पष्ट होते की, राजकिशोर मोदी नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक यांच्या कंपनीला पैसे दिले आहेत. राजकिशोर मोदी ही व्यक्ती जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येते. त्याच्यावर जमीन बळकावणे, हत्येचा प्रयत्न करणे आदीसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याचीही चौकशी केली जात आहे.

या कागदपत्रांच्या आधारे राजकिशोरने लिप्स अँड बाऊंड्स प्रा. लि.मध्ये दीड कोटी रूपयांची गुंतवणूक केली. अभिषेक जेव्हा या कंपनीचे संचालक होते. तेव्हा त्यांना याचे कमिशनही देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, २००९ साली स्वत: ममता बॅनर्जी यांनी राजकिशोरला अटक व्हावी, यासाठी आंदोलन केले होते.