केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार असणार आहेत. रविवार १० ऑक्टोबर ते बुधवार १३ ऑक्टोबर दरम्यान एस जयशंकर हे अनुक्रमे किर्गिस्तान, कझाकिस्तान आणि आर्मेनिया या देशांना भेट देतील. जयशंकर यांच्या या दौऱ्यामार्फत भारताच्या तिन्ही देशांशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. त्याचसोबत, या देशांतील विकासासंदर्भात चर्चा करण्याची आणि मतं मांडण्याची संधी मिळेल, असं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.

‘या’ देशाचा पहिलाच दौरा

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एस जयशंकर यांच्या या दौऱ्याची तपशीलवार माहिती दिली आहे. जयशंकर हे रविवारीच किर्गिस्तानला पोहचतील. भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांचा या देशाचा हा पहिलाच दौरा असेल. यावेळी ते किर्गिझ समकक्ष रशियन कझाकबेव आणि देशाचे राष्ट्रपती सादिर जपारोव यांची भेट घेतील. यावेळी भारत-किर्गिस्तान या दोन्ही देशांदरम्यान काही सामंजस्य करार देखील होण्याची शक्यता आहे.

एस जयशंकर सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी कझाकिस्तानला रवाना होतील. तिथे ते कॉन्फरन्स ऑफ इंटरॅक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स इन एशियाच्या (सीआयसीए) ६ व्या मंत्रीस्तरीय बैठकीला उपस्थित राहतील. ज्यांचं अध्यक्षस्थान सध्या कझाकिस्तानकडे आहे. तर, एस जयशंकर यावेळी कझाकचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान मुख्तार तिलेउबर्डी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र आर्मेनियाला पहिलीच भेट

पुढे आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी एस जयशंकर आर्मेनियाला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितल्यानुसार, भारतीय परराष्ट्र मंत्र्याची स्वतंत्र आर्मेनियाला ही आत्तापर्यंतची पहिलीच भेट असेल. यावेळी, जयशंकर हे आपले आर्मेनियन समकक्ष अरारत मिर्झोयान यांची भेट घेतील. तसेच पंतप्रधान निकोल पशियन्यान यांच्याशी देखील ते संवाद साधतील.