LIC IPO Closing Date : देशातील सर्वात मोठ्या एलआयसी आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही देखील या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजच हे काम पूर्ण करून घ्या. आज म्हणजेच ९ मेला हा आयपीओ बंद होणार आहे.

या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज पाचव्या दिवशी १.७२ पट जास्त सबस्क्रायबर वाढले आहे. पॉलिसीधारकांनी आतापर्यंतचा सर्वात जास्त उत्साह दाखवला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेल्या शेअरला ४.८० पट बोली प्राप्त झाली आहे. कर्मचारी आणि पॉलिसीधारकांसाठी राखीव भाग पहिल्याच दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, बीएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार, पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (QIBs) शेअरसाठी सर्वात कमी बोली प्राप्त झाली आहे.

यापूर्वी २ मे रोजी एलआयसीने अँकर गुंतवणूकदारांकडून ५,६२७ कोटी रुपये उभे केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांचे ७१ टक्के हिस्सेदारी देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी विकत घेतली आहे. या आयपीओद्वारे ३.५ टक्के हिस्सा विकून २१ हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे.

एलआयसी आयपीओचा तपशील

  • एलआयसी आयपीओची किंमत ९०२ ते ९४९ रुपये प्रति शेअर आहे.
  • एलआयसी आयपीओची लॉट साइज १५ शेअर्स आहे.
  • किरकोळ गुंतवणूकदार एलआयसी आयपीओमध्ये जास्तीत जास्त १४ लॉट घेऊ शकतील.
  • सरकार एलआयसी आयपीओमधील ३.५ टक्के हिस्सा विकत आहे.
  • हा हिस्सा २१ हजार कोटी रुपयांचा आहे.
  • एलआयसी आयपीओ १७ मे रोजी सूचीबद्ध होऊ शकतो.
  • एलआयसी आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति शेअर ४५ रुपये सूट देण्यात आली आहे.
  • तर एलआयसी विमाधारकांसाठी प्रति शेअर ६० रुपये सवलत देण्यात आली आहे.

ग्रे मार्केट मध्ये काय आहे किंमत?

इश्यू उघडल्यानंतर, ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअरचा प्रीमियम सतत कमी होत आहे. इश्यू उघडण्यापूर्वी ते ९० रुपयांवर पोहोचले होते आणि इश्यू उघडण्यापूर्वी एक दिवस ८५ रुपयांवर होते. तेव्हापासून ग्रे मार्केटमध्ये त्याचा प्रीमियम कमी होत आहे. सध्याच्या बाजारातील परिस्थितीचाही ग्रे बाजारभावावर परिणाम दिसून येत आहे.