“तुम्ही देशवासियांची मनं जिंकलीत”, पॅरालिम्पिकमधील कामगिरीनंतर मोदींनी केलं खेळाडूंचं अभिनंदन

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकांची संख्या १७ झाली आहे

narendra Modi congratulated the athletes
भारताने आतापर्यंत चार सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकांची संख्या १७ झाली आहे. भारताने आतापर्यंत चार सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. भारताने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये ५ पदके जिंकली आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विजेत्या खेळाडूंवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. “भारताचे खेळाडू विविध खेळात टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदके आणत आहेत याचा आनंद होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. आतापर्यंत पदक जिंकलेल्या सर्व खेळाडूंचे मोदींनी कौतूक केले आहे.

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी शनिवार हा दिवस अतिशय खास ठरला. पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.

प्रमोदपूर्वी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी P4 मिश्रित ५० मीटर पिस्तूल SH1 नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदक जिंकल्याबद्दल सिंहराज सिंह अधाना यांचे अभिनंदन केले. याशिवाय त्यांनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनीष नरवालचेही अभिनंदन केले. त्यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आणि भारतीय खेळांसाठी हा विशेष क्षण असल्याचे सांगितले.

१९ वर्षीय मनीष नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला. त्याचबरोबर अधानाने २१६.८ गुण मिळवून रौप्य पदक जिंकले. दोन्ही नेमबाज फरीदाबाद, हरियाणाचे रहिवासी आहेत. यापूर्वी पात्रता फेरीत अधाना ५३६ गुणांसह चौथ्या आणि नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता.

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा गौरव होत आहे. तरुण आणि अतुलनीय प्रतिभावान मनीष नरवाल यांनी मोठी कामगिरी केली. त्याने सुवर्णपदक जिंकणे हा भारतीय खेळांसाठी एक खास क्षण असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

तसेच टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने सुवर्णपदक जिंकले. प्रमोदचे देखील नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. “प्रमोद भगत यांनी संपूर्ण राष्ट्राची मने जिंकली आहेत. तो एक चॅम्पियन आहे, ज्याचे यश लाखो लोकांना प्रेरित करेल. त्याने उल्लेखनीय कामगिरी आणि दृढनिश्चय दाखवला.”, असे मोदी म्हणाले.

मनोज सरकारचे देखील मोदींनी कौतूक केले आहे. ते म्हणाले, “मनोज सरकारने अप्रतिम कामगिरी केली. बॅडमिंटनमधील प्रतिष्ठित कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.”


भारताच्या खात्यात आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये १७ पदके झाली आहेत. भारताने ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्यपदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिक १९६० पासून होत आहे. भारत १९६८ पासून पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. भारताने १९७६ आणि १९८० मध्ये भाग घेतला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tokyo paralympics narendra modi congratulated the athletes india medal in paralympics srk

ताज्या बातम्या