रस्ते अपघाताच्या अनुषंगाने देशपातळीवर १०३३ हा दूरध्वनी क्रमांक टोल फ्री हेल्प-लाइन क्रमांक म्हणून कार्यान्वित करण्यात आला आहे, त्यामुळे अपघातावेळी लोकांना तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि रस्त्यावरील अपघाताच्या अनुषंगाने १०३३ या क्रमांकाला राष्ट्रीय स्थरावरील हेल्प-लाइन क्रंमाक म्हणून घोषित केल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले. त्याचबरोबर इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लि.(आयएचएमसीएल) व नॅशनल हायवेज अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) यांच्या एका कंपनीला राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाईन केंद्र चालविण्याची अनुमती देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत दिली. या अनुषंगाने भौगोलिक महत्त्वानुसार आयएचएमसीएलकडून सहा ठिकाणी या योजनेची उभारणी केली जाणार आहे, त्यांपैकी चार क्षेत्रांमध्ये त्याच्या उभारणीला सुरुवातदेखील झाली आहे.

चौकट- पश्चिम विभागात अहमदाबाद येथे केंद्र उभारले जाणार असून त्यामाध्यमातून गोवा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, दादरा, नागरी हवेली आणि दमण-दिव यांचा समावेश आहे. तर दक्षिणेकडे म्हैसूरमध्ये आंध्र-प्रदेश, कर्नाटक, केरला, तामिळनाडू, तेलंगणा, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि पाँडेचरीचा समावेश आहे. दिल्ली क्षेत्रासाठी गुडगावमध्ये केंद्र उभारले जाणार असून त्या माध्यमातून दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश व छत्तीसगड विभागासाठी मोहाली येथे केंद्र उभारले जाणार आहे.