ब्रिटनमधील मजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते टोनी बेन यांचे निधन

भारताबद्दल विशेष प्रेम असणारे बुजुर्ग म्हणून ओळखले जाणारे मजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते टोनी बेन यांचे शुक्रवारी निधन झाले.

भारताबद्दल विशेष प्रेम असणारे बुजुर्ग म्हणून ओळखले जाणारे मजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते टोनी बेन यांचे शुक्रवारी निधन झाले. ८८ वर्षांचे टोनी बेन गंभीर आजारी होते. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी बेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
बेन हे १९६० व ७० च्या दशकात मजूर मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. आपले वडील पश्चिम लंडनमधील राहत्या घरी शांतपणे मृत्यूस सामोरे गेले. त्यांचे सर्व कुटुंबीय त्या वेळी उपस्थित होते, असे निवेदन स्टीफन, हिलरी, मेलिस्सा व जोशुआ या त्यांच्या मुलांनी जारी केले आहे. त्यांनी आम्हाला जे प्रेम आणि माया दिली, त्याची उणीव कायम राहील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
टोनी बेन हे अत्यंत प्रभावी असे लेखक, वक्ते आणि प्रचारक होते. लोकसेवा आणि राजकीय कारकिर्दीचा त्यांचा वारसा मोठा होता. त्यांच्याशी बोलणे कधीही कंटाळवाणे ठरले नाही. तुम्ही त्यांच्या मताशी सहमत नसाल तरीही त्यांचे बोलणे कधी कंटाळवाणे वाटले नाही, या शब्दांत कॅमेरून यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते एड मिलीबॅण्ड यांनीही टोनी बेन यांना श्रद्धांजली अर्पण केली असून बेन हे अत्यंत मनापासून बोलत असत तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांच्या तत्त्वांना मोठे स्थान होते. तुम्ही त्यांच्याशी सहमत असा अथवा नाही परंतु ते जे काही बोलत असत, त्यावर ते ठाम होते, असे मिलिबॅण्ड यांनी सांगितले.
१९५० मध्ये खासदार झालेल्या बेन यांनी ब्रिटनचे पंतप्रधानद्वय हेरॉल्ड विल्सन व जेम्स कॅलघ्ॉन यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा संभाळली होती.
टोनी बेन यांना भारताबद्दल विशेष आस्था होती. बेन यांच्या वडिलांनीच महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांची भेट घालून दिली होती. भारतप्रेमाचा वारसाच त्यांना एक प्रकारे वडिलांकडून मिळाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tony benn veteran labour politician dies aged

ताज्या बातम्या