बंगळुरु या ठिकाणी एका कोरियन महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरियन महिला आली होती. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने तिचा लैंगिक छळ केला आणि विनयभंगही केला असा आरोप या महिलेने केला आहे. या कर्मचाऱ्याचं नाव अफान अहमद आहे. १९ जानेवारीला ही घटना घडली असा आरोप या महिलेने केला आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

कोरियन महिला बंगळुरु विमानतळावर आली. त्यावेळी इमिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर अफान अहमद या अधिकाऱ्याने तिला रोखलं. तिचं तिकिट आणि बॅग तपासण्याचं कार देत तिच्याशी बातचीत सुरु केली. बॅगेतून बीपचा आवाज येत असल्याचं सदर अधिकाऱ्याने या महिलेला सांगितलं. जर काऊंटरवर बॅग तपासण्यात आली तर तुला उशीर होईल असंही त्याने सांगितलं. यानंतर सदर महिलेला आरोपी अफान हा वॉशरुममध्ये घेऊन गेला. तिथे त्याने मला टी शेपमध्ये उभं केलं. त्यानंतर त्याने या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. तिच्या छातीसह प्रायव्हेट पार्ट्सना हात लावण्यास सुरुवात केली. तो वारंवार असंच करु लागला आणि त्याने महिलेला पाठीमागून मिठी मारली. यानंतर सदर महिलेने त्याला तू हे काय करत आहेस म्हणत अडवलं तेव्हा ओके थँक्स असं म्हणून तो अधिकारी तिथून निघून गेला. आपला विनयभंग झाल्याचं या महिलेला लक्षात येताच तिला धक्का बसला.

कोरियन महिलेने विमानतळ सुरक्षा विभागाशी केला संपर्क

या घटनेनंतर सदर कोरियन महिलेने विमानतळ सुरक्षा विभागाशी संपर्क केला आणि पोलिसांत अफानची तक्रार दिली. ज्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरु केली. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अफानला अटक करम्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

एअर इंडियाने कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं

सदर घटनेची माहिती मिळताच एअर इंडियाने अफान अहमदला नोकरीवरुन कमी केलं आहे. तसंच पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई त्याच्या विरोधात करावी असंही म्हटलं आहे. कोरियन महिलेसह घडलेला प्रसंग हा अतिशय चुकीची बाब आहे, आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. तसंच आम्ही पीडित महिलेच्या बाजूने उभे आहोत तिला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु, तसंच अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घेऊ असंही एअर इंडियाने म्हटलं आहे.