भटक्या कुत्र्यांविषयीच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या एका पीठाने माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना खडे बोल सुनावले आहेत. मनेका गांधी यांनी भटक्या कुत्र्यांबाबत जी वक्तव्यं केली ती ऐकली तर कळेल की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. न्यायालय म्हणून आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला आहे आणि त्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस विक्रम नाथ, जस्टिस संदीप मेहता आणि जस्टिस एनवी अंजारिया यांनी हे खडे बोल मनेका गांधींना सुनावले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे?

मनेका गांधी यांच्या वतीने राजू रामचंद्रन हे कोर्टात बाजू मांडत होते. त्यावेळी पीठाने म्हटलं की काही वेळापूर्वी आपण हे सांगत होतात की न्यायालयाने कुठलंही विधान करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. पण मग तुमच्या अशील मनेका गांधी यांनी कशी वक्तव्यं केली आहेत. मनेका गांधी यांनी न्यायालयाचा अपमान केला आहे. पण आम्ही मोठं मन दाखवत त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तुम्ही त्यांचा पॉडकास्ट ऐकलाय का? त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे बघितलं का?

रामचंद्रन यानंतर काय म्हणाले?

कोर्टाने ही विचारणा केल्यानंतर रामचंद्रन म्हणाले की मी या अजमल कसाबलाही न्यायालयात हजर केलंय. त्यावर तातडीने जस्टिस नाथ म्हणाले की कसाबने कोर्टाचा अपमान केला नाही. त्यावर रामचंद्रन म्हणाले की मी एका हेतूचं प्रतिनिधित्व करतो आहे. वकील आणि न्यायाधीश हे एका स्तरावर असतात तर राजकीय नेते वेगळ्या स्तरावर. त्यावर पीठाने रामचंद्रन यांना विचारलं की तुमच्या अशील प्राणी हक्कांसंबंधीच्या कार्यकर्त्या आहेत. तसंच त्या कॅबिनेट मंत्रीही होत्या. त्यांनी उपाय योजना लागू करण्यासाठी काय योगदान दिलं ते सांगू शकाल का? त्यावर रामचंद्रन यांनी मौन बाळगलं.

मनेका गांधींनी काय म्हटलं होतं?

तीन लाख कुत्र्यांना हटवले, तर आजूबाजूच्या भागांमधून इतर तीन लाख कुत्री येतील, कारण त्यांना येथे अन्न मिळते. मग तुम्ही काय कराल? दिल्लीमध्ये माकडांची समस्या आहे. ते झाडांवर राहतात, कारण खाली कुत्री असतात. जर कुत्री नसतील, तर माकडे जमिनीवर येतील. मग तुम्ही त्यांचेही निर्मूलन करणार का? दिल्ली महापालिकेच्या गैरव्यवस्थापनामुळे ही मोठी समस्या निर्माण झाले आहे. महापालिका म्हणते, त्यांच्याकडे ७७ निवारा केंद्रे आहेत. ही ७७ केंद्रे गेल्या २० वर्षांपासून रिकामी पडून आहेत. त्यांचे आकारमान किती आहे? तिथे फक्त एक डॉक्टर आहे. तिथे तुम्ही किती कुत्र्यांना ठेवणार? कर्मचारी नियुक्त करून सर्व व्यवस्था करणे, काही ठिकाणी दुरुस्ती यासाठी दोन, तीन, चार वर्षे लागतील. आठ आठवड्यांच्या मुदतीत ते शक्य होणार नाही अशी वक्तव्यं मनेका गांधींनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर आता नाराजी दर्शवली आहे.