Jaish-e-Mohammed Terrorist Confession: जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने ऑपरेशन सिंदूरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘भारताकडून ऑपरेशन सिंदूर सुरु झाल्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ‘गजवा-ए-हिंद’चा नारा दिला होता’, असा खुलासा दहशतवादी इलियास काश्मिरी याने केला आहे. ५ फेब्रुवारी रोजी, पाकव्याप्त रावलकोट येथे इलियास काश्मिरी संघटनेच्या सदस्यांना संबोधित करत होता.

इलियास काश्मिरी काय म्हणाला?

युद्ध सुरू झाले, शस्त्रे बाहेर काढण्यात आली. लढाऊ विमाने, टँक समोरासमोर उभे राहिले. आणि कमांडरने (असीम मुनीर) घोषित केले की, हे ‘गजवा-ए-हिंद’ आहे. हे बुनयान अल-मर्सूस आहे. (गजवा-ए-हिंद – शरियानुसार ही संज्ञा इस्लामिक राजवट स्थापन करण्यासाठीच्या सशस्त्र संघर्षासाठी वापरली जाते.) जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेत नव्याने भरती झालेल्या सदस्यांना इलियास संबोधित करत होता.

जिहाद हेच ब्रीदवाक्य – इलियास

“आमचं नाव, आमची ओळख, आमचे ब्रीदवाक्य जिहाद आहे. सरकार सोबत असो किंवा नसो आमचं जिहाद हेच ब्रीदवाक्य. जिहाद करुन काश्मीर मुक्त करु”, असे चिथावणीखोर वक्तव्य दहशतवाद इलियासने केले आहे. इलियासचे ताजे वक्तव्यामुळे पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी यांच्यातील संबंध पुन्हा एकदा उघड झाले आहेत. पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना देत असलेले अभय देखील अधोरेखित झाले आहे.

दहशतवादी इलियास काश्मिरी कोण आहे?

इलियास काश्मिरी हा जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती देणारा हाच तो इलियास आहे. इलियास वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्याने चर्चेत असतो.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरविरोधात पाकचे बुनयान अल-मर्सूस

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. भारतीय सैन्याने या घटनेला उत्तर म्हणून पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवत नऊ ठिकाणी हवाई हल्ला करत दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तानकडून याला उत्तर म्हणून बुनयान अल-मर्सूस ऑपरेशन सुरु केले होते.

ऑपरेशन सिंदूरचे यश

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याला अभूतपूर्व यश मिळाले होते. यात अनेक दहशतवादी ठार झालेच शिवाय पाकिस्तानमध्ये कार्यरत असणारे दहशतवादी तळ देखील नष्ट करण्यात आले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या महत्वाच्या विमानतळांना देखील टार्गेट केलं होते.