ढाका : बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदूंविरुद्धचा हिंसाचार आणि मंदिरांवर झालेले सामूहिक हल्ले यांच्या संबंधांत गुरुवारी रात्री ३५ वर्षांच्या एका बांगलादेशी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. इक्बाल हुसेन याला व्यापक शोधमोहिमेनंतर कॉक्स बाझारच्या समुद्रकिनाऱ्यावरून गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. ढाक्याच्या आग्नेयेला १०० किलोमीटरवर असलेल्या दुर्गापूजा मंडपात त्यानेच कुराणाची प्रत ठेवल्याचा संशय आहे.

दुर्गापूजा उत्सवादरम्यान समाजमाध्यमांवर कथित ईश्वारनिंदात्मक मजकूर प्रसारित झालयानंतर गेल्या बुधवारपासून बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी उशिरा रात्री एका जमावाने देशातील हिंदूंच्या ६६ घरांचा विध्वंस केला, तसेच किमान २० घरे पेटवून दिली.

‘गेला आठवडाभर सुरू असलेल्या व्यापक धार्मिक असंतोषामागील प्रमुख संशयित असलेल्या कुमिला येथील इक्बाल हुसेन याला आम्ही कॉक्स बाझार किनाऱ्यावरून अटक केली आहे’, पोलीस मुख्यालयातील प्रवक्त्याने सांगितले. पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणा आता या ‘उनाड’ माणसाची चौकशी करतील, सेही तो म्हणाला.