लंडन : जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ असे नामकरण केलेला करोनाचा (कोविड १९) संभाव्यत: अधिक संक्रमणशील उत्परिवर्तित विषाणू हा मोठा उत्पात घडवू शकणार नाही, कारण सध्याच्या करोना प्रतिबंधक लशी या त्या विषाणूपासून निर्माण होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करू शकतात, असा दावा ब्रिटिश सरकारचे सल्लागार असलेल्या एका शास्त्रज्ञाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटन सरकारच्या सायंटिफिक अ‍ॅडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीज (एसएजीई) चे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ प्रा. कॅलम सेम्पल यांनी हा दावा केला आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोविड १९ चे बी.१.१.५२९ हे उत्परिवर्तन आढळून आल्यानंतर जगभरातील माध्यमांत त्याच्या घातकतेबाबत चर्चा सुरू आहे. त्याबाबत प्रा. सेम्पल ‘बीबीसी’शी बोलताना म्हणाले की, ‘‘हे नवे उत्परिवर्तन म्हणजे आपत्ती नाही. हा विषाणू अतिघातक असल्याचे आमच्या काही सहकाऱ्यांचे म्हणणे म्हणजे त्याचा नको तितका बाऊ करण्यासारखे आहे.’’ लसीकरणातून निर्माण झालेली प्रतिकारशक्ती ही तुम्हाला गंभीर आजारांपासून वाचवू शकते. तुम्हाला सर्दीपडसे, तापासारखी साधी दुखणी होऊ शकतात; पण रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही, मृत्यूची शक्यताही कमी असते. लशीमुळे असेच संरक्षण भविष्यातही मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ब्रिटनने दक्षिण आफ्रिका, बोस्टवाना, लेसेथो, एस्वाटिनी, झिम्बाब्वे आणि नामिबिया या सहा दक्षिण आफ्रिकी देशांविरोधात प्रवास र्निबध जारी केले आहेत. तेथे आढळलेला नवा विषाणू हा अधिक संसर्गजन्य किंवा लशीला दाद न देणारा आहे काय, याची माहिती घेतली जात आहे, असे ब्रिटनच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top uk scientist says new covid 19 variant omicron likely to protect by vaccination zws
First published on: 28-11-2021 at 00:13 IST