शुक्रवारी रात्री अमेरिकेतील मिसिसिपी प्रदेशात भयावह चक्रीवादळ धडकलं आहे. वेगवान वाऱ्यासह धडकलेल्या या वादळात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या वादळात काही लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या वादळात सुमारे १०० मैलचा परिसर प्रभावित झाला आहे.'एबीसी न्यूज'ने याबाबत वृत्त दिलं आहे. मिसिसिपीचे गव्हर्नर टाटा रीव्ह्स यांनी सांगितले की, मिसिसिपीला धडकलेल्या तुफान वादळात २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "काल रात्रीच्या हिंसक चक्रीवादळात किमान २३ नागरिकांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले आहेत, याची आम्हाला माहिती आहे. बचावकार्य आणि शोधमोहीम अद्याप सुरू आहे." "एमएस डेल्टामधील अनेकांना आज रात्री आपल्या प्रार्थनेची आणि देवाच्या संरक्षणाची गरज आहे. आम्ही वैद्यकीय मदत सुरू केली आहे. प्रभावित झालेल्या लोकांसाठी आणखी रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सुविधा वाढवत आहोत. शोधमोहिम आणि बचावकार्य केलं जात आहे. आजची रात्र सावध राहा, सतत मिसिसीपीचा हवामान रिपोर्ट पाहत राहा," असं आवाहन गव्हर्नर रीव्ह्स यांनी केलं. दरम्यान, मिसिसिपी आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेनं एक ट्वीट करत म्हटलं की, "शुक्रवारी रात्री आलेल्या चक्रीवादळात २३ जणांचा मृत्या झाला आहे. तर डझनभर लोक जखमी आहेत. याशिवाय अन्य चार लोक बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळपासून असंख्य स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव दलाकडून शोधमोहीम राबवली जात आहे. प्रभावित नागरिकांना मदत देण्यासाठी तातडीची पावलं उचलली जात आहेत."