देशात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा आता ६०६ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत हा आकडा ८७ने वाढला आहे. यांपैकी ५५३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ४२ रुग्णांवर उपचार करुन रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. तर यांपैकी आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

देशातील करोना रुग्णांची संख्या मंगळवारी ५१९वर पोहोचली होती. राज्यात मंगळवारी आणखी एका रुग्णाच्या मत्यूमुळे देशातील करोनाबळींची संख्या १०वर गेली होती. त्यात आज (बुधवारी) मध्य प्रदेशमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याने ही बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे.

बुधवारी राज्यात करोनाबाधितांची संख्या ११६ वरुन १२२ वर पोहोचली. यामध्ये सकाळी सांगतील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना संसर्गातून बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर मुंबईत नव्याने ५ आणि ठाण्यात १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

दरम्यान, देशातील ३२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी ३१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केलं होतं. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत असल्याने आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला.