Supreme Court Parents Property Rules verdict: आई-वडिलांची मालमत्ता हडप करणाऱ्या एका मुलाला सुप्रीम कोर्टाने जोरदार फटकारले आहे. “आईच्या पाया पडून तिची माफी माग आणि आशीर्वाद घे”, अशा शब्दांत मुलाला तोंडी सुनावताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्याची याचिका फेटाळून लावली. तसेच ६० दिवसांच्या आत घर मोकळे करावे आणि आई-वडिलांना नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले.
नेमके प्रकरण काय?
दिल्लीतील एका वृद्ध दाम्पत्याने आयुष्यभर झटून आपल्या घामाचे पैशांनी घर बांधले होते. मुलाच्या लग्नानंतर त्यांनी प्रेमापोटी पहिला मजला मुलगा आणि सुनेला दिला. त्यांच्याकडून कोणतेही भाडे आकारले नाही. मात्र काही काळानंतर पोटच्या मुलाने पत्नीसह मिळून खोटी कागदपत्रे तयार केली आणि ते घर त्यांच्या मालकीचे असल्याचे भासवले.
मुलगा आणि त्याच्या पत्नीने बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेवर मालकी हक्क सांगायला सुरुवात केल्यानंतर वाद निर्माण झाला. प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर कनिष्ठ न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयाने आई-वडिलांच्या बाजूने निकाल दिला. मात्र मुलाने तरीही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला उचित ठरवले आणि मुलाची याचिका फेटाळून लावली. युक्तिवाद सुरू असताना न्यायमूर्ती शर्मा यांनी मुलाला चांगलेच खडे बोल सुनावले. “तू आईच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला हवा आणि आतापर्यंत ज्या चुका केल्यास त्याबद्दल माफी मागायला हवी”, अशा शब्दांत शर्मा यांनी मुलाला फटकारले.
सुनावणीदरम्यान काय झाले?
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्या. शर्मा यांनी वकिलांकडे पाहून म्हटले, या मुलाचे वर्तन चुकीचे वाटत नाही का? न्यायालयाला वाटते की, त्याने आईजवळ जाऊन तिच्या पाया पडावे आणि तिचा आशीर्वाद घ्यावा. यावेळी खंडपीठाने भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचा दाखला देत आईला मिळणाऱ्या सन्मानाबद्दलही भाष्य केले.
मालमत्तेच्या नावाखाली आपल्या पालकांना त्रास देणाऱ्या किंवा त्यांची फसवणूक करणाऱ्या मुलांच्या वर्तनाला कायद्याने संरक्षण दिले जाऊ शकत नाही, असेही खंडपीठाने म्हटले.
पुण्यात मालमत्तेवरून आई-वडिलांना मुलांची मारहाण
पुण्यातील इंदापूर येथे काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. आईच्या नावावर असलेली जमीन का विकली, या कारणावरून दोन मुलांनी मिळून आपल्या ६५ वर्षीय वृद्ध शेतकरी वडिलांना आणि आजारी आईला रस्त्यात अडवून मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला गेला.
