ओडिशा सरकारमधील पर्यटन मंत्री महेश्वर मोहंती यांच्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले आहेत. काही अज्ञात व्यक्तींनी मोहंती यांच्या निवासस्थानाजवळच  त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, एका कार्यक्रमातून सहभागी होऊन मोहंती आपल्या निवासस्थानाकडे दुचाकीवरून परतत होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांचा काही काळ पाठलाग केला. त्यानंतर आमला क्लबजवळ ते आले असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली आहे. सुरवातीला त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यानंतर भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. मोहंती यांची प्रकृती स्थिर असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. मोहंती हे 1995 पासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांना कायदा मंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारलेली आहे.