कोलंबो : देशातील अभूतपूर्व आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल अध्यक्ष गोताबया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांच्यासह सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी श्रीलंकेतील सुमारे १ हजार कामगार संघटनांनी गुरुवारी १ दिवसाचा देशव्यापी संप केला.

१९४८ साली ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंका सध्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाला तोंड देत आहे. या संकटाचे एक प्रमुख कारण विदेशी चलनाचा अभाव हे आहे. याचाच अर्थ, मुख्य अन्न आणि इंधन यांच्या आयातीसाठी पैसे देण्याची देशाची क्षमता नाही. यामुळे देशात तीव्र टंचाई निर्माण झाली असून वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ‘लोकांसमोर झुका- सरकार घरी जा’, अशा घोषवाक्यासह आरोग्य, बंदरे, वीज, शिक्षण व टपाल यांसारख्या सरकारी सेवांसह अनेक क्षेत्रांतील कामगार संघटना संपात सहभागी झाल्या होत्या. अध्यक्ष, पंतप्रधान व सरकार यांनी ‘घरी परत जावे’, अशी त्यांची मागणी होती. एक हजाराहून कामगार संघटना संपात सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला.