गाडी थांबवून कागदपत्रं दाखवण्यास सांगितल्याने पोलिसाचं केलं अपहरण; उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना

२९ वर्षीय चालकाची गाडी थांबवून पोलिस हवालदाराने त्याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली. मात्र त्याने त्या पोलिसाला गाडीत बसण्यास सांगितलं.

Police
यासंदर्भातील माहिती पोलीसांच्या प्रवक्त्यांनीच दिलीय (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआय)

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये एका ३८ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आल्याची घटना घडलीय. या पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करुन त्या गाडीमधून फिरवून आणत नंतर एका निर्जनस्थळी सोडून देण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे केवळ गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याचं एका व्यक्तीने चारचाकीमधून अपहरण केलं.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा सर्व प्रकार सूरजपूरमध्ये रविवारी घडल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका वाहतूक पोलीसने नेहमीप्रमाणे गाडीच्या तपासणीदरम्यान एका व्यक्तीला थांबवून गाडीची कागदपत्र मागितली. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं. गाडीची कागदपत्र मागणाऱ्या पोलीस हवालदाराला २९ वर्षीय चालक सचिन रावळने कागदपत्र पाहण्यासाठी गाडीत बसा असं सांगितलं. पोलीस कर्मचारी गाडीमध्ये शिरल्यानंतर त्याने वेगाने गाडी सुरु करत मिळेल त्या वाटेने जाण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी गाडी आडवलेली तिथून १० किलोमीटरवर जाऊन सचिनने या पोलीस कर्मचाऱ्याला गाडीतून खाली धक्का दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गुरुग्राममधील एका शोरुममधून गाडी चोरी केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी माहितीच्या आधारेच सचिनला तपासणीसाठी थांबवलं होतं. “ही गाडी दोन वर्षांपूर्वी चोरली होती. टेस्ट ड्राइव्हला जातो सांगून एका शोरुममधून ही गाडी लंपास करण्यात आलेली,” असं पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

“सचिन हा गोबी बचेडा या ग्रेटर नोएडाच्या बाजूला असणाऱ्या एका छोट्याश्या गावात राहतो. त्याने गाडीवर बनावट नंबर प्लेट लावली होती. गावातीलच एका व्यक्तीच्या गाडीची नकली नंबर प्लेट बनवून तो ही चोरलेली गाडी वापर होता,” असं पोलिसांनी सांगितलं. ज्या वाहतूक पोलिसाचं अपहरण करण्यात आलेलं त्याचं नाव विजेंद्र सिंग असं होतं.

विजेंद्रने सचिन चालवत असणारी मारुती स्विफ्ट डिझायर गाडी थांबली आणि सचिनकडे कागदपत्रं मागितली. त्यावर सचिनने माझ्या मोबाईलमध्ये परिवहनच अॅप असून तुम्ही गाडीत बसा मी तुम्हाला त्यावर कागदपत्र दाखवतो असं सांगितलं. मात्र विजेंद्र गाडीत बसल्यावर सचिनने सेंट्रलाइज लॉक लावून गाडी दहा किलोमीटरपर्यंत नेली. दरम्यान विजेंद्रने ११२ वर फोन करुन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करुन अजिबपूर पोलीस स्थानकाच्या चेकपोस्टजवळ सचिनला अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traffic cop stopped car to check papers up man kidnapped him arrested scsg

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या