हाथरस (उत्तर प्रदेश), पीटीआय उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११६ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाथरसमधील पुलराई गावामतील सत्संग कार्यक्रमासाठी हजारो भाविक जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडताना ही चेंगराचेंगरी झाली. सिकंदरराव शहरातील ट्रॉमा केअर सेंटरच्या परिसरात ५० ते ६० मृतदेह ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समाजमाध्यमांवरील छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफितींमध्ये अनेक जखमी किंवा मृत पीडित ट्रॉमा केअर सेंटरच्या बाहेर (पान ८ वर)(पान १ वरून) पडल्याचे दिसत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी जमा झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असण्याची शक्यता सिंकंदररावचे पोलीस प्रमुख आशिष कुमार यांनी वर्तविली. आग्रा येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगडच्या विभागीय आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली असून चौकशी सुरू केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातलगांना २ लाख रुपये व जखमींना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान साहाय्यता निधीमधूनही मृतांच्या नातलगांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केली आहे. या दुर्घटनेबद्दल घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. महिला व मुलांसह भाविकांच्या मृत्यूचे वृत्त हृदयद्रावक आहे. मृतांच्या नातलगांप्रती सहवेदना व्यक्त करते, असे राष्ट्रपतींनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर लिहिले आहे. पंतप्रधानांचा भाषणादरम्यान शोकसंदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावाला उत्तर देत असतानाच हाथरस दुर्घटेनेचे वृत्त आले. त्यावेळी भाषणातच पंतप्रधानांनी शोकसंदेश दिला. ‘या चर्चेदरम्यान एक वाईट बातमी आली आहे. हाथरसमध्ये चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली आहे. यामध्ये बळी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींना लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना करतो. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. पीडितांना हरतऱ्हेची मदत दिली जाईल, असे मी या (संसदेच्या) व्यासपीठावरून सर्वांना अश्वास्त करतो,’ असे पंतप्रधान म्हणाले.