Karachi Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत. कराचीमधील एका रहिवासी इमातीत गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी ही घटना घडली. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर इमारतीचा मोठा भाग कोसळ्याने दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते.
दुर्घटनेची पोलिसांनी दिली माहिती?
पहाटे साडेचारच्या सुमारास कराचीमधील सोल्जर बाझार परिसरातील एका रहिवासी इमारतीत ही घटना घडली. “रमजानचा पवित्र महिना सुरु झाल्याने अनेक ठिकाणी पहाटेच्या सुमारास लोक जागे होते”, अशी माहिती येथील पोलिस अधिकारी जमशेद अशहर यांनी माध्यमांनी दिली आहे. सिलिंडर गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटामुळेच ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गॅस गळतीमुळेच स्फोट
घटनास्थळी पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केल्यानंतर आत्तापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, जखमी १४ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून काहीजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर अगोदर खराब स्थितीत असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने अपघात झाला, असे स्थानिक सांगत आहेत.
मृत आणि जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश
या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे. नऊ ते १७ वयोगटातील मुलांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेकजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्यात कराचीमध्ये झालेल्या दुर्घटनेत ७९ जणांचा मृत्यू झाला होता. शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये लागलेल्या आगीत अनेकजण ठार झाले होते. त्यानंतर कराचीमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
