Iran Supreme Leader Mojtaba Khamenei Family Death: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका- इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर इराणने मुलगा मोजतबा खामेनी याची सर्वोच्च नेतेपदी निवड केली आहे. अमेरिकेने या निवडीवरुन नाराजी व्यक्त केली असली तरी या नाराजीला न जुमानता इराणच्या संसदेत एकमताने मोजतबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. वडील अयातुल्ला यांचा मृत्यू झाला त्याच हल्ल्यात मोजतबा यांनी आई, बायको आणि मुलाला देखील गमावल्याची माहिती आता समोर आली आहे.
बायको – मुलाचा मृत्यू
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, २८ फेब्रुवारी अमेरिका- इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात मोजतबा यांची पत्नी जाहरा हदाद अदेल आणि दोन मुलापैकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मोजताबा यांना एकूण तीन आपत्य होती. पैकी दोन मुले आणि एक मुलगी आहे. दरम्यान. यापैकी एका मुलाचा मृत्यू झाल्याचे इराणच्या माध्यमांनी म्हटले आहे. मोजतबा यांनी या हल्ल्यात बायकोसह मुलालाही गमावल्याचे सांगितले जात आहे.
वडिलांसह आईचाही मृत्यू
सर्वोच्च नेते अयातुल्ला यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची पत्नी व मोजतबा यांची आई मानसोरेह बागेरजादेह यांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मोजतबा यांच्या घरातील एकूण चार लोकांचा या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय कुटुंबातील आणखी चार सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त देखील आहे पण, याची खात्रीलायक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बहिणीचे कुटुंबही खल्लास
पण, इराणी माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, हवाई हल्ल्यात मोजतबा यांची बहीण, भाचा, भाची आणि भावोजींचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे मोजतबा यांच्या घरातील एकूण आठ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
निवडीवर अमिरेका – इस्त्रायल नाराज
मोजतबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर चीन आणि रशियांकडून स्वागत करण्यात आले आहे. पण, अमेरिकेकडून या निवडीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी तर पुन्हा एकदा इराणला इशारा देत मत विचारात न घेतल्यास नवा नेता कितीकाळ पदावर असेल सांगता येत नाही, असे वक्तव्य केले आहे. तसेच, इस्त्रायलकडून देखील पुन्हा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.
