पोलिस, रुग्णवाहिका व अन्य सुविधांसाठी आतापर्यंत वेगवेगळे क्रमांक फिरवावे लागत होते पण ते क्रमांक ऐन वेळी आठवणे व नेमक्या सुविधेसाठी फोन लावणे यात गफलती होत असत. अग्निशमनाचा फोन पोलिसांना व पोलिसांचा फोन अग्निशमनला असे प्रकार घडत असत पण आता या सेवांसाठी एकच क्रमांक फिरवला तरी काम होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी तुम्ही ११२ क्रमांक फिरवलात, की आपत्कालीन सेवा तुम्हाला मिळेल. त्यात पोलिस, अग्निशमन व रुग्णवाहिका या प्रमुख सेवांचा समावेश आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने हा प्रस्ताव आज मांडलाय
अमरिकेत ९११ क्रमांक फिरवल्यानंतर या सेवा मिळतात. त्याच धर्तीवर भारतात ११२ क्रमांक फिरवून या सेवा मिळवता येतील. आतापर्यंत आपत्कालीन सेवांसाठी १००, १०१, १०२ व १०८ हे क्रमांक हेल्पलाइन म्हणून उपयोगी होते पण आता ११२ क्रमांक हा जादूचा आकडा ठरणार आहे. तो फिरवला की कोणतीही आपत्कालीन सेवा तुम्हाला मिळू शकेल.
प्राधिकरणाने म्हटले आहे, की ११२ क्रमांक हा आपत्कालीन सेवांसाठी वापरण्यात यावा. हा नवीन क्रमांक जनजागृती करून सर्वाना सांगण्यात यावा.
सध्याचे १००, १०१, १०२, १०८ हे क्रमांक राहतील पण ते दुय्यम असतील. जर या क्रमांकावर फोन केलात तर तो ११२ या दूरध्वनीक्रमांकाला वळवला जाईल.  लँडलाइन व मोबाइलवरून हा फोन करता येईल. आउटगोइंग बंद किंवा फोन सेवा तात्पुरती बंद असेल तरी हा फोन लागेल. या क्रमांकावर एसएमएस केला तरी ती एसएमएस करणारी व्यक्ती कुठल्या ठिकाणी आहे, हे सेवा पुरवठादार कंपनीला सांगावे लागेल. सार्वजनिक सुरक्षा उत्तर केंद्रे लोकांच्या तक्रारी किंवा निराशात्मक विचारांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी सुरू करण्याची सूचना प्राधिकरणाने केली आहे.
नवीन पद्धतीनसार सरकारला प्रतिसाद व्यवस्थापन सेवा सुरू करण्यास सांगण्यात आले असून ही सेवाही ११२ क्रमांकाशी जोडली जाणार आहे.
पीसीआर व्हॅन (पोलिस नियंत्रण कक्ष), अग्निशमन बंब व रुग्णवाहिका यांना जीपीएस लावणे बंधनकारक करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षा केंद्रातून (पीएसएपी) उत्तरे देताना इंग्रजी, हिंदूी व स्थानिक भाषेत उत्तरे देण्याची सोय करावी असेही सुचवण्यात आले आहे. त्यासाठी प्रादेशिक डाटाबेस प्रत्येक महानगरात तयार केला जाणार आहे. त्यात देशभरातील दूरसंचार सेवापुरवठादारांची यादी असणार आहे. गोपनीय माहितीसाठी बीएसएनएल जबाबदार असेल व माहितीची गुप्तता त्यांना पाळावी लागणार आहे. माहिती केंद्र (डाटा सेंटर) स्थापन करण्याचे काम बीएसएनएलला दिले असून त्यात सेवा वापरणाऱ्यांची सूची सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांकडून घेतली जाईल, ती वेळोवेळी सुधारली जाईल पण ती माहिती गुप्त राहील.

संकटात असाल तर डायल करा हा क्रमांक
* जेव्हा तुम्हाला पोलिसांची, अग्निशमन दलाची व इतर आपत्कालीन मदत हवी असेल, तेव्हा आता वेगवेगळे क्रमांक फिरवायची गरज नाही केवळ ११२ क्रमांक फिरवला की हवी ती सेवा तुम्हाला मिळेल.
* ११२ हा भारतात एकमेव आपत्कालीन क्रमांक असणार
* लँडलाइन किंवा मोबाइलवरूनही फोन करता येणार
* फोन काही कारणाने बंद असेल, तरी या क्रमांकाला फोन लागणार
* अमेरिकेत ९११ हा ऑल इन वन आपत्कालीन क्रमांक आहे, त्याच धर्तीवर ही सेवा.
* आधीच्या म्हणजे १००, १०१, १०२, १०८ या क्रमांकावर फोन केला, तरी तो ११२ क्रमांकाकडे फिरवला जाणार.
सध्याच्या पद्धतीत १००- पोलिस, १०१- अग्निशमन यंत्रणा, १०२ रुग्णवाहिका, १०८- आपत्कालीन सेवा (वैद्यकीय व इतर) या प्रमाणे सेवा आहेत.
* एसएमएस पाठवला तरी व्यक्ती कुठे आहे हे समजणार