तालिबान आणि त्यांची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी दहशतवादविरोधी कारवायांवर तैनात सुरक्षा दलांसाठी आता एक नवीन प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की केंद्रीय सुरक्षा आस्थापनेने या सुरक्षा दलांना नवीन पद्धतीने प्रशिक्षण देण्यास आणि त्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्यास सांगितले आहे.

याबद्दल न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानात तालिबानने वर्चस्व प्राप्त केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या सुरक्षा दलांसाठी असलेल्या प्रशिक्षण मॉड्यूलमध्ये तालिबानशी संबंधित कोणतीही माहिती नाही. भारताने काही दिवसांपूर्वी अशी भीती व्यक्त केली होती की, अफगाणिस्तान तालिबाननंतर पश्चिमेकडील पाकिस्तानच्या सीमेवर घुसखोरी करु शकते आणि दुसरीकडे पूर्वेकडील खुली सीमा या भागात घुसखोरी होण्याची शक्यता आहे. अमेरिकी सुरक्षा दल अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर केंद्रीय सुरक्षा दलांनी ओळखलं आहे की आपल्या शेजारी देशात घडामोडी वेगाने घडत आहेत आणि भारतालाही याची जाणीव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – अफगाणिस्तानात विद्यार्थी-विद्यार्थिनींत पडदा

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं की, बीएसएफ आणि एसएसबी, राज्य पोलीस युनिट आणि सीआरपीएफ तसेच जम्मू पोलीस कर्मचारी जे आता दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत त्यांच्या प्रशिक्षणात आता सीमा व्यवस्थापनाच्या बदललेल्या अटींचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तालिबानबद्दल माहिती समाविष्ट आहे.

अधिकारी म्हणाले की, आमचे लक्ष गेल्या 20 वर्षांच्या घडामोडींवर आहे, ज्या ९/११च्या हल्ल्यानंतर घडल्या. ते म्हणाले की, तयार करण्यात येत असलेल्या नवीन मॉड्यूलमध्ये तालिबानचे नेतृत्व, पद्धती इत्यादींवर नवीन माहिती अपडेट केली जात आहे. ते म्हणाले की, चेकपोस्टवर उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना तालिबान आणि त्याच्या कारवायांशी संबंधित इतिहास आणि माहिती जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.