आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेपर्यंत व्यवहार बंद

अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानच्या राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेपर्यंत व परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानशी संबंध तोडले असून सध्या कुठलेही व्यवहार त्या देशाशी केले जाणार नाहीत.

नाणेनिधीने म्हटले आहे, की अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाले असले तरी त्याला अजून जागतिक समुदायाने मान्यता दिलेली नाही. अफगाणिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत आम्हालाही तीव्र चिंता आहे त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय समुदायाने तेथील मानवतावादी पेचप्रसंगावर तातडीने पावले उचलावीत.

नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राइस यांनी सांगितले, की आम्ही अफगाणिस्तानशी असलेले संबंध व व्यवहार तूर्त बंद करीत आहोत. कारण तेथील सरकारला अद्याप मान्यता मिळालेली नाही. अफगाणिस्तानच्या सरकारला जागतिक समुदायाने मान्यता दिली तर हे संबंध पुन्हा प्रस्थापित करता येतील. नाणेनिधीकडून अफगाणिस्तानला केली जाणारी मदत रोखण्यात आली असून सध्या तरी कुठलीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही.

१५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील सत्ता तालिबानने ताब्यात  घेतली होती. त्यांनी निर्वाचित सरकारला पदच्युत करून हे कृत्य केले होते. तालिबानने आता अंतरिम सरकार स्थापन केले असून त्यात तालिबानचे वरिष्ठ नेते सहभागी आहेत.

अनेक जागतिक नेत्यांनी असे जाहीर केले आहे,की आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेली आश्वासने तालिबान पाळतो की नाही याचे निरीक्षण करणार आहोत. अफगाणिस्तानातील सरकार सर्वसमावेशक असले पाहिजे तरच त्याला राजनैतिक मान्यता दिली जाईल असे धोरण त्यांनी स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात दारिद्र्य व दुष्काळ असून त्यातच नाणेनिधीने संबंध तोडल्याने त्या देशाचे हालच होणार आहेत.