पतियाळा : पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यात खलिस्तानविरोधी मिरवणुकीवरून दोन गटांत झालेल्या चकमकींत ४ जण जखमी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी पंजाब सरकारने ३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, तसेच जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित केल्या. ‘आप’ सरकारने पतियाळा परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या तत्काळ प्रभावाने बदल्या केल्या. मुखिवदर सिंग चिना यांना पतियाळाचे नवे पोलीस महानिरीक्षक म्हणून, तर दीपक पारिक यांना नवे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. वझीर सिंह हे पतियाळाचे नवे पोलीस अधीक्षक असतील.

 चिना हे पोलीस महानिरीक्षक म्हणून राकेश अग्रवाल यांच्या जागी आले असून, पारिक हे नानक सिंह यांच्याकडून वरिष्ठ पोलीस अधीक्षक हे पद स्वीकारणार आहेत. शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात व शांततपूर्ण असल्याचा दावा पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शनिवारी केला. कालिमाता मंदिराबाहेर चकमकी झडलेल्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारच्या घटनेच्या विरोधात अनेक हिंदु संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे पतियाळा शहरातील अनेक बाजारपेठा शनिवारी बंद राहिल्या.  शुक्रवारच्या हिंसाचारामागील लोकांविरुद्ध दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस व जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर काही हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींनी मंदिराबाहेरील ‘धरणे’ आंदोलन स्थगित केले, तसेच प्रस्तावित निषेध मोर्चाही पुढे ढकलला.