बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत बांधण्याची नितीन गडकरी यांची योजना केवळ रस्तेच नव्हे तर राज्यातील पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नातही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातले आहे. याशिवाय मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसराचा संपूर्ण विकास करून जगातील सर्वात उंच दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीपेक्षा उंच टॉवर उभारण्याची योजना तयार केली आहे. तर मुंबईतील संरक्षण दलाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या झोपडय़ांच्या पुनर्विकासाला मान्यता देण्याची तयारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दर्शविली आहे. रस्ते विकास खात्याचे मंत्री या नात्याने गडकरी यांनी राज्यातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहेच, पण त्याचबरोबर राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. याकरिता केंद्रीय पाणीपुरवठामंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत बैठकही आयोजित केली आहे. गडकरी यांनी महाराष्ट्रात अधिक लक्ष देण्यास सुरुवात केल्याने त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राज्याचा विकास होणार नाही, असे गडकरी यांचे त्यावर उत्तर आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. मुंबई-गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांंमध्ये पूर्ण करण्याची योजना आहे. राज्यात रस्त्यांची कामे जलदगतीने व नवीन तंत्रज्ञानाने लवकरात लवकर पूूर्ण केली जातील, असे गडकरी यांनी सांगितले. मुंबई बंदराचा सारा कायापालट केला जाणार असून, या जागेत मुंबईतील नवीन व्यावसायिक विभाग तयार करण्याची गडकरी यांची योजना आहे. पाच मोठे व्यावसायिक टॉवर्स उभारले जातील. तसेच दुबईच्या १३५ मजली बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा उंच इमारत उभारण्याची योजना तयार केली आहे. यातील प्रत्येकी ४० मजले हॉटेल्स व कार्यालयांकरिता उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री अधिक ‘राजा’ - पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्रीपद की संरक्षणमंत्रीपद यापैकी कोणते पद अधिक चांगले वाटते यावर कधीही मुख्यमंत्री राजा असतो, असे उत्तर पर्रिकर यांनी दिले.