Tremors felt in Kolkata as 5.5 earthquake jolts Bangladesh near Dhaka marathi news : बांगलादेशची राजधानी ढाकाजवळ शुक्रवारी ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, या भूकंपाचे धक्के थेट भारतातील कोलकाता आणि ईशान्य भारतातील अनेक भागांत जाणवले, या भूकंपाबद्दल युएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS)ने माहिती दिली आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदु हा ढाका शहरापासून ५० किमी अंतरावर नरसिंगडी येथे होता. तर या भूकंपाची खोली १० किमी इतकी होती, असे यूएसजीएसने सांगितले आहे. दरम्यान या भूकंपात अद्याप कोणतेही मालमत्तेचे किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

कोलकाता येथे अनेक लोकांना सकाळी १०.१० च्या सुमारास काही सेकंदांसाठी धक्के जाणवले, ज्यामुळे लोक घाबरून घरे आणि इमारतींमधून बाहेर पडले. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी देखील या भूकंपाच्या वेळी इमारती हालत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पश्चिम बंगालच्या इतर भागात देखील भूकंप जाणवला, यामधअये कूच बेहर आणि दक्षिण आणि उत्तर दिनाजपूर यांचा समावेश होता. गुवाहाटी, आगरतळा आणि शिलाँग यांसारख्या शहरांमधील अनेक रहिवाशांनीही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती दिली.

या भूकंपाने ढाका येथे बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यातही थोड्या वेळासाठी व्यत्यय आणला. काही मिनिटांनंतर खेळ पुन्हा सुरू झाला आणि यादरम्यान कोणतेही नुकसान झाल्याचे अद्याप वृत्त मिळालेले नाही.