Kolkata Earthquake News: शुक्रवारी दुपारी बांगलादेशला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्याचे धक्के पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह दक्षिण बंगालच्या मोठ्या भागात जाणवले. दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कोलकात्यापासून पूर्व ईशान्येच्या १०२ किमी अंतरावर ५.५ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरनुसार भूकंपाची खोली ३५ किमी होती.

कोलकातामधील रहिवासी ओमकार त्रिवेदी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, भूकंपाचे धक्के काही सेकंद जाणवले. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, माझी पार्किंगमध्ये असलेली गाडी जोरात हलत होती.

या भूकंपाच्या धक्क्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकजण इमारतींमधून बाहेर पडून रस्त्यावर जमले. कोलकाता आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात, लोकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपली घरे आणि कामाची ठिकाणे सोडून मोकळ्या जागेत जाण्याचा निर्णय घेतला.

कोलकाताशिवाय हावडा, हुगळी, झाडग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर या जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मेदिनीपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील लोक भीतीच्या सावटाखाली आले. त्यांनी इमारतीबाहेर पळ काढून मोकळ्या जागेत आसरा घेतला.

केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार कोलकाता येथे एका कार्यक्रमात भाषण करत असताना भूकंपाचे धक्के जाणवू लागले. यावेळी मजुमदार यांनी मी भाषण थांबवावे का? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. आयएनएस वृत्तसंस्थेने याबाबतचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ट्रायपॉडवर उभा केलेला कॅमेरा जोरात हलत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सोशल मीडियावरही भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. असंख्य लोक रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये बाहेर आलेले दिसत आहेत.

गृहिणी रिया गुप्ता द इंडियन एक्सप्रेसशी म्हणाल्या, “मी पलंगावर एक मालिका पाहत होते आणि अचानक माझा पलंग थरथरायला लागला. मला वाटले की, हा भूकंप असू शकतो. त्याचवेळी माझे कपाटही मला हलताना दिसले. इतके तीव्र हादरे मी पहिल्यांदाच अनुभवत होते.” एको सलूनचे मालक बिभास लाहा यांनी सांगितले की, मी केस कापत असताना मला पायाखालची जमीन हलल्यासारखे वाटले. मी लगेच एका खुर्चीवर बसलो. हे भूकंपाचे धक्के असल्याची मला तेव्हा जाणीव झाली.