तीन पुरूषांनी माझं अपहरण करण्याचा प्रयत्न केला मी दिल्लीतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या बाहेर उभी होते त्यावेळी ही घटना घडली असं नागालँडच्या महिलेने सांगितलं आहे. दिल्लीतल्या चाणक्यपुरी भागात ही घटना घडली असं पोलिसांनी सांगितलं आहे. ही घटना रविवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास घडली असंही पोलिसांनी सांगितलं. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे असंही पोलिसांनी सांगितलं.

नेमकी काय घटना घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाणक्यपुरी भागातल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या पार्किंमध्ये तीन पुरूष मर्सिडीज कारमध्ये बसले होते. त्यांनी मोठ्या आवाजात गाणी लावली होती. नागालँडची महिला तिच्या काही मित्रांसह पार्किंगमध्ये आली. त्यावेळी मोठ्याने गाणी का लावली असं या तिघांना विचारलं. यानंतर ही महिला एक्झिट गेटच्या दिशेने जात होती. त्यावेळी ही कार महिलेच्या जवळ थांबली. त्यातल्या एकाने या महिलेला कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आणि इतर दोघांनीही त्याला मदत केली. या महिलेने आरोप केला आहे की या तिघांनी तिला अपहरण करण्याचा प्रयत्न केला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी FIR दाखल केली आहे.

महिलेच्या मित्रांना हॉकी स्टीकने मारहाण

या महिलेने पुढे सांगितलं की माझं जेव्हा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा माझा मित्र मधे पडला. त्यानंतर या तिघांनी त्याला हॉकी स्टीकने मारहाण केली. त्याच्या तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर माझे इतर दोन मित्र आले त्यांनाही या तिघांनी हॉकी स्टीकने मारलं अशीही तक्रार या महिलेने केली आहे. ज्याचा उल्लेख पोलिसांनी FIR मध्ये केला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या मित्राच्या दातालाही दुखापत झाली आहे. तसंच एका मित्राच्या उजव्या हाताला सूज आली आहे. या ठिकाणी जेव्हा पोलीस पोहचले तेव्हा कारमधून घटनास्थळी असलेले आरोपी पळून गेले. पोलिसांनी हे सांगितलं की तक्रारदार महिलेने या कारचा नंबर लिहून घेतला होता, ज्यामुळे या तिघांना शोधण्यास मदत झाली असंही पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर महिलेला राम मनोहर लोहिया रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिची मेडिकल तपासणी करण्यात आली. तसंच मर्सिडीज मधल्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्या महिलेने तक्रार केली तिचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे. तसंच या घटनेचे जे पुरावे समोर येत आहेत ते देखील गोळा केले जात आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे.